रानमळा गावचा आदर्श घ्या; वनखात्याचे आवाहन

राजगुरुनगर – वृक्षसंवर्धन आणि शिक्षणात राज्यात प्रगतीवर असलेल्या रानमळा गावाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे येथील जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी यांनी शैक्षणिक उपक्रमात घेतलेले सहभाग प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महसूल व वन खात्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले.

रानमळा येथील जिल्हा परिषशाळेचा अमृतमहोत्सवानिमिताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खारगे बोलत होते. यावेळी खेड पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अंकुश राक्षे, नंदा सुकाळे, माजी पंचायत समिती सदस्या मंगला शिंदे, विभागीय वन अधिकारी दिलीप घोलप, उपवनसंरक्षक (प्रभारी) बी. के. भावसार, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, संयुक्‍त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य पी. टी. शिंदे, जीर शिंदे, गणेश थिगळे, शांताराम घुमटकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, गावातील लावण्यात येणाऱ्या झाडांची पालखीतून भव्य भव्य वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली. आगरमाथा ते रानमळा या रस्त्याच्या दुतर्फा विकास खारगे, आमदार सुरेश गोरे, आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते नारळाची झाडे लावण्यात आली. या दिंडीमध्ये या शाळेचे पहिले शिक्षक स्व. महादेव पुरुषोत्तम खेडकर यांचे सुपुत्र पुरुषोत्तम खेडकर, शाळेचे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी नाथा शिंदे, पंडित शिंदे, राष्ट्रीय वेटलिफ्टर दिव्यांग विद्यार्थिनी धनश्री दौंडकर, शाळेच्या माजी विद्यार्थिनी पूजा फुलवरे, वर्षा कुळधर्मे, सपना शिंदे-रासकर, पुणे म. न. पा. चे उपायुक्त या शाळेचे माजी विद्यार्थी शिवाजी दौंडकर यांची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

या कार्यक्रमात शाळेचे आजी -माजी शिक्षक, विविध क्षेत्रातील गुणवंत व यशवंत माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थ्यानी शाळेला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये निधी भेट दिला. माजी विद्यार्थी प्रा. नितीन वाघोले यांनी रानमळा गावावरील दोन माहितीपट स्वखर्चाने तयार करून प्रदर्शित केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here