परभणी – परभणी जिल्हा प्रशासन कोविड लसीकरणासंदर्भात आता निर्वाणीच्या भूमिकेत आले असून, येत्या दहा दिवसात पहिला डोस घ्या, अन्यथा पुन्हा तुम्हाला लस घेण्याची संधी मिळणार नाही, असा थेट इशाराच जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परभणीकरांना दिला आहे.
परभणी जिल्ह्यात 72 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. तर केवळ 37 टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
लसीकरणात राज्याच्या तुलनेत परभणी हे प्रचंड मागे आहे. त्यामुळेच आता जिल्हा प्रशासन पहिल्या लसीच्या मागे न लागता 20 डिसेंबरनंतर दुसऱ्या डोसवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळे ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर पहिला डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यात अद्यापही साडेचार लाख नागरिकांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे लसीकरणाच्या बाबतीत मराठवाड्याच्या 9 जिल्ह्यांपैकी परभणीचा नंबर पाचवा आहे. तर राज्याच्या 36 जिल्ह्याची तुलना करता लसीकरणात परभणीचा नंबर 29 वा आहे.