विनामास्कसाठी कठोर कारवाई करा – हसन मुश्रीफ

ट्रेसिंग झाल्यावर उपचार सुरू करा – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गावागावात प्रबोधनावर भर देवून नियमावली समजवून सांगा. विनामास्क असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तर समूह संसर्ग थांबविण्यासाठी सर्वांनीच सतर्क राहून प्रयत्न करावेत. ट्रेसिंग झाल्यावर तात्काळ संबंधितावर उपचार सुरू करा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातून आज सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक अधिकारी यांच्याबरोबर व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे संवाद साधण्यात आला. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, तहसिलदार अर्चना कापसे आदी उपस्थित होते.

रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट सुरू करा
ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले, दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. 15 ऑगस्टपर्यंत परिस्थिती अशीच राहील. त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेवून पूर्वतयारी असली पाहिजे. रॅपिड ॲन्टीजेन टेस्टला सुरूवात करावी. लक्षणे दिसल्यावर व्यक्तीला उपचारासाठी त्वरित दाखल करावे. नागरिकांनीही लक्षणे दिसल्यास स्वत:हून उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

विनामास्कबाबत कठोर कारवाई करा
विशेषत: ग्रामीण भागात मास्क वापरण्यासाठी गावा-गावात प्रबोधन करावे. सामाजिक अंतर राखण्याबाबतही माहिती द्यावी. जे विनामास्क असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. रूग्णसंख्या वाढत असतील तर गावाने कडक लॉकडाऊन करावे. एकही मृत्यू होणार नाही याची सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असेही ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले.

समूह संसर्ग थांबविण्यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री
पालकमंत्री सतेज पाटील यावेळी म्हणाले, सर्वांनीच आता सतर्क राहून खबरदारी घेण्याची गरज आहे. समूह संसर्ग थांबविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. लक्षणं दिसल्यावर उपचार सुरू झाला पाहिजे. त्यासाठी झालेल्या सर्वेक्षणाचा नियोजनासाठी वापर करा. सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी अधिक काळजी घ्यावी. मृत्यू रोखण्यासाठी ट्रेसिंग झाल्याबरोबर उपचार सुरू करा. व्याधीग्रस्त नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करा.

जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा ग्रामसमिती, प्रभाग समिती यांना सक्रीय झालं पाहिजे. माझ्या तालुक्यात, माझ्या गावात एकही मृत्यू होणार नाही याबाबत दक्ष रहा. इली, सारी या रूग्णांची माहिती मिळविण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यासोबत बैठक घ्या. अशा रूग्णांना ताबडतोब उपचारासाठी पाठवावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकायचे नाही, सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे याबाबत गावामध्ये दवंडी देवून ग्रामस्थांचे प्रबोधन करावे. त्याबाबत त्यांना सवय लावा. त्यानंतरही जर कुणी या नियमांचा भंग करत असेल तर त्यांच्यावर

दंडात्मक कारवाई करा, नियमभंग करणाऱ्यांचे दैनंदिन पास रद्द करा-जिल्हाधिकारी
नोकरी अथवा व्यवसायाच्या निमित्ताने नजिकच्या जिल्ह्यात विशेषत: सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी दैनंदिन पास देण्यात आले आहेत. अशा पासधारकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर त्याचबरोबर सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. परजिल्ह्यातून आपल्या घरी परतल्यानंतर आवश्यक ती खबरदारी घेणे त्यांना बंधनकारक आहे. विनाकारण, विनाकाळजी असे जर कुणी समुहामध्ये फिरत असेल, नियमांचा भंग करत असेल तर अशा पासधारकांचे दैनंदिन पास रद्द करावेत. विशेषत: शिरोळ, जयसिंगपूर या नगरपालिकांनी याबाबत सोमवारपासून कडक अंमलबजावणी करावी. यासाठी विशेष पथकं नेमून पोलीस, गृहरक्षक दल यांची मदत घ्यावी.

मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल म्हणाले, ग्रामसमित्यांनी सक्रीय होवून टेस्टींग, ट्रेसिंग आणि आयसोलेटींग यावर भर द्यावा. प्रत्येक आशाकडे पल्स ऑक्सिमीटर असायला हवे. सर्वांनी दक्ष रहा. महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात पास घेवून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवा. काहीजण बैठकीच्या निमित्ताने येतात त्यांच्यासोबत असणाऱ्या कुटुंबाला इथे ठेवतात, अशांवरही नियमानुसार कार्यवाही करा. व्याधीग्रस्त व्यक्तींची यादी घेवून त्याबाबत अधिक सतर्कतेने काम करू.

डॉ. साळे यांनीही जिल्ह्यातील मृत्यूदर रोखण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या. विशेषत: व्याधीग्रस्त रूग्णाला उपचारासाठी पुढे पाठवताना ऑक्सिजन देवून पाठवावे, असे सांगितले. उच्च व्याधीग्रस्तांसाठी गावा-गावात 10-10 च्या संख्येने बोलवून शिबिरात त्यांची तपासणी करावी. मृत्यूदर टाळण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहायला हवे, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.