पुणे – आगामी आर्थिक वर्षात (1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021) मध्ये मिळकतकराच्या थकबाकीदारांसाठी पालिकेकडून अभय योजना राबविण्यात येणार आहे. या वर्षात पालिकेची ही थकबाकी 5 हजार कोटींच्या वर जाणार आहे. त्याच्या वसुलीसाठी थकबाकीदारांना महापालिकाच बॅंकेकडून कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ही कर्जाची रक्कम संबंधित थकबाकीदाराने पालिकेस जमा केल्यानंतर त्यांना बॅंकेचे कर्ज हप्त्याने फेडण्याची सुविधा मिळणार आहे.
कर वसुलीसाठी पहिल्यांदाच असा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार अहे.त्यासाठीच्या बॅंका निश्चित करून महापालिका या त्यांच्याशी करारही करणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित मिळकतधारकाला आपली मिळकत बॅंकेत तारण म्हणून ठेवावी लागणार आहे. महापालिकेच्या घटलेल्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर लवकरच ही योजना प्रस्तावित केली जाणार असली तरी, त्यात अनेक कायदेशीर अडथळेही येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत मिळकतकराची थकबाकी 4 हजार 200 कोटींवर गेली आहे. तर पुढील आर्थिक वर्षात या थकबाकीत सुमारे 27 टक्के वाढ होणार आहे. त्यातच, महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने शहरातील विकासकामांवरही मर्यादा येत आहेत. त्यामुळे थकबाकीची अधिक प्रभावी वसुली करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पुढाकार घेतला असून अंदाजपत्रकात थकबाकी योजना आणणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी प्रशासनाकडून ही योजना राबविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच ही योजना कार्यन्वीत करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मिळकतकर धारकाची जी थकबाकी आहे, त्यामधील शास्तीची जी रक्कम आहे, त्यात 70 ते 80 टक्के इतकी सवलत देऊन नागरिकांकडून ही थकबाकी वसूल होणार आहे. त्यासाठी कालावधी निश्चित केला जाणार आहे.
मान्यतेसाठी प्रस्ताव स्थायी समितीसमोर
ही योजना जाहीर झाल्यानंतर तत्काळ थकबाकीची रक्कम भरणाऱ्यांना अधिकाधिक सवलत देण्याचे प्रशासनाकडून विचार सुरू आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल झाल्यास या योजनेचा फायदा होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.