पाच दिवसांत गुन्हा दाखल करा

अजित पवार यांच्यासह माजी संचालकांना हायकोर्टाचा दणका
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरण

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बॅंकेच्या माजी संचालकांना उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. या प्रकरणात नाबार्ड तसेच पोलिसांचा अहवाल पाहता प्रथमदर्शनी गुन्हा दाखल होऊन चौकशी होणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करून तक्रार करण्यात आलेल्या बॅंकेच्या सर्व माजी संचालकांविरोधात आजपासून पाच दिवसांच्या आत गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करा, असे आदेश न्यायालयाने आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूत गिरणी आणि साखर कारखान्यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले. परंतु या कर्जाची परतफेड न झाल्याने बॅंकेचे प्रचंड नुकसान होऊन बॅंक अवसायानात गेली. यात सुमारे 25 हजार कोटींचा घोटाळा झाला. याला तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार आहे, असा आरोप करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती करणारी याचिका सुरींदर अरोरा यांच्या वतीने ऍड. सतीश तळेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. एस. एस. शिंदे यांच्यासमोर तीन आठवड्यापूर्वी सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने या सर्व संचालकांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. भादंवि कलम 169 नुसार आरोपात तथ्थ नसल्याचा अहवाल सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो न्यायालयाने हाणून पाडला. भादंवि कलम 169 नुसार आरोपात तथ्थ नसल्याचा अहवाल कसला दाखल करता. तो अधिकार तुम्हाला कोणी दिला, अशा शब्दांत राज्य सरकारचे कान उपटले होते.

गुन्हा दाखल करून चौकशी करणार आहात का आम्ही आदेश द्यायचा अशी विचारणाही न्यायालयाने केली होती. राज्य सरकारने मात्र मौन घेतले. अखेर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय आज जाहिर केला. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या 42 जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या 34 माजी संचालकांविरोधात पाच दिवसांत गुन्हा दाखल करून कायद्यानुसार चौकशी करा, असा आदेश आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले.

यात बॅंकेचे तत्कालीन संचालक असलेले अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण, माणिकराव पाटील, दिलीप देशमुख, गुलाबराव शिर्के, प्रसाद तानपूरे, खासदार आनंदराव अडसूळ, सुरेश देशमुख, जयंत पाटील, दिलीप सोपल, राजन तेली, शिवाजीराव नलावडे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस नेत्यांचा समावेश आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×