पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. नेमका हा काळ किती आणि परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्याच्या मनात संभ्रम आणि भीती निर्माण झालेली आहे. आता तातडीने ही पूर्व घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिला आहे.
राज्य शासन आणि आयोग विद्यार्थ्याच्या मानसिकतेशी खेळत आहे. लाखो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि उत्तीर्ण होऊन राज्याच्या कुशल प्रशासनास आपला हातभार लावू इच्छित असतात. राज्य सरकार मात्र या बाबत संवेदनशील नसल्याचे यादव यांनी सांगितले.
राज्यातील वाढती बेरोजगारी, करोनाच्या प्रादुर्भावाने बिघडलेली सामन्य माणसांची आर्थिक घडी यात रोजगार इच्छुक विद्यार्थी वर्ग हतबल झाला आहे. याला राज्यसरकार आणि आयोगाचा कारभार कारणीभूत असेल. आज राज्यभरात सर्व काही सुरू असतांना फक्त परीक्षा का घेतल्या जात नाहीत याचे उत्तर तरी सरकारने द्यावे. तातडीने निर्णय न झाल्यास विद्यार्थी हितासाठी आंदोलनाचा हाच मार्ग अवलंबवा लागणार आहे, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी शासनाकडे निवेदनही पाठविले आहे.