रक्‍ततपासणीच्या माध्यमातून रुग्णांची लूट

सहाशे रुपये आकारण्याचे शासन आदेश; अठराशे रुपयांची आकारणी

– अमरसिंह भातलवंडे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या डेंग्यूने धुमाकुळ घातला आहे. डेंग्यू सदृश्‍य अजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे, उपचारासाठी खासगी दावाखान्यासह महापालिकेच्या दावाखान्यामध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान, खाजगी रुग्णालयामध्ये रक्तजल नमुने तपासण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील पॅथोलॉजी लॅब मधील रक्ततपासणीसाठी घेण्यात येणाऱ्या दरामध्येही मोठी तफावत आढळून येत आहे. शासनाने या तपासण्यांसाठी सहाशे रुपये आकारावेत असे आदेश यापूर्वीच दिलेले असताना शहरातील लॅबधारक बाराशे ते अठराशे रुपये नागरिकांकडून आकारत असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन महिन्यांपासून डेंग्यूसदृश्‍य अजार वाढले आहेत. एडिस्‌ इजिप्ती नावाचा डास चावल्यामुळे ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उल्टी, मळमळ, असा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे, उपचारासाठी शहरातील खासगी दावाखान्यासह महापालिकेच्या दावाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. मागील 13 दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात 22 जणांना डेंग्यूची लागण झाली होती. तर तपासणीसाठी हजाराहून अधिक रुग्ण दाखल झाले होते. रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे खासगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लुट सुरू झाल्याचे रुग्ण सांगत आहेत. खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना रक्तजल नमुन्याच्या तपासणीसाठी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयामधील पॅथोलॉजीमध्ये 1 हजार 200 रुपये तर काही ठिकाणी 1 हजार 600 रुपये वसूल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे अतिदक्षता विभाग असलेल्या काही नामांकित रुग्णालयात तर याच तपासणीसाठी चक्क 1 हजार 800 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे.

वायसीएम रुग्णालयात मोफत तपासणी
खासगी रुग्णालयांकडून रुग्णंची डेंग्यू सदृश्‍य आजारांची तपासणी करतेवेळी लूट सुरू असताना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मात्र, सर्व प्रकारची तपासणी मोफत करण्यात येत आहे. रक्तजल तपासणीसाठी शुल्क आकरण्यात येत नाहीत. डेंग्यूमध्ये असणारे एनएस 1, आयजीएम, आयजीएनच्या तपासणीसाठी नोडल सेंटरमधून ही तपासणी करण्यात येते. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना डेंग्यूवर उपचार घेण्यासाठी वायसीएम रुग्णालय हक्काचा अधार ठरत आहे.

सहाशे रुपये दर आकारण्याचे शासन आदेश
पॅथोलॉजीची नोंदणी, विविध रक्त तपासणीचे दर यासंदर्भात राज्य शासनाकडून 2016 रोजीच सहाशे रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे. डेंग्यूच्या रक्तजल नमुने तपासणीसंदर्भात 600 रुपयांपेक्षा अधिक दर घेत येत नाही. गेल्या तीन वर्षांत शासनाने नवे दरपत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे जुनेच दर आकारणे बंधनकारक असतानाही पॅथोलॅजीचे संचालक मात्र मोठ्या रकमेची आकारणी करून रुग्णांची लूट करत असल्याचे पहावयास मिळत आहे.

शासनाने डेंग्यूच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांनी सहाशे रुपये शुल्क आकारावे, अशा सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे अधिक दर घेणे नियमबाह्य आहे. शिवाय डेंग्यू सदृश्‍य आजाराच्या रुग्णांनी उच्च शिक्षण झालेल्या तंत्रज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. रुग्णांनी वायसीएम रुग्णालयात रक्‍तजल नमुन्यांची तपासणी मोफत केली जात असल्याने त्याचा फायदा घ्यावा.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

Leave A Reply

Your email address will not be published.