डॉ. दीपक म्हैसेकर : नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांची आढावा बैठक
पुणे – विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होऊ नये तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याबरोबरच काही खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात. जिल्ह्यातील असुरक्षित, संवेदनशील अशा मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलीस विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुणे जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, रामनाथ पोकळे, पोलीस अधिक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया शांततेत-सुरळीत आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी सर्व नोडल अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करावे, तसेच येत्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
दरम्यान, पूरबाधीत मतदारांसाठी विशेष मोहीम घेऊन त्यांना तातडीने नव्याने मतदान ओळखपत्रे अथवा मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या 11 पुराव्यांपैकी एक ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या.
सार्वजनिक सभांच्या जागा निश्चित कराव्यात
निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रत्येक पक्षाला आणि उमेदवारांना त्यांचा प्रचार करण्यासाठी जाहीर सभा घ्याव्या लागतात, अशा सभा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सार्वजनिक जागा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलीस विभागाशी समन्वय ठेवून निश्चित कराव्यात. पहिली मागणी करणाऱ्याला प्राधान्य या तत्त्वानुसार जागा उपलब्ध करून द्यावी, मात्र कोणालाही ती जागा सलग ब्लॉक करून ठेवू देऊ नयेत. प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.