भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांसाठी उपाययोजना करा ! आमदार सुनील शेळके यांची विधानसभेत मागणी

वडगाव मावळ -अतिवृष्टीमुळे मावळ तालुक्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा. या गावांचा गांभीर्याने विचार करून राज्य सरकारने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशनात केली.
आमदार शेळके म्हणाले की, यापूर्वी माळीण दुर्घटनेनंतर प्रशासनाने एक सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये मावळातील अनेक गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचा अहवाल देण्यात आला होता. या सर्वेक्षणानुसार मावळ तालुक्यातील भुशी, बोरज, ताजे, गभालेवाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग, मालेवाडी, लोहगड, पाले ना.मा., नायगाव, साई, वाउंड, कल्हाट, सावळा, टाकवे खु., शिलाटणे, सांगिसे, नेसावे इत्यादी गावांमध्ये भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. तर बोरज, माऊ, भुशी, कळकराई, मालेवाडी, तुंग, लोहगड आणि ताजे ही आठ गावे अतिसंवेदनशील असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येत आहे.
आमदार शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात विविध प्रलंबित प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे. अतिवृष्टीसह अनेक कारणांमुळे भूस्खलनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने मावळ तालुक्यातील अनेक गावांना धोका असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळातील संवेदनशील गावांमधील भूस्खलनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्या गावातील नागरिक भीतीच्या छायेखाली राहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावयाच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येतात. परंतु यावर योग्य निर्णय घेऊन कायमचा तोडगा काढला गेला पाहिजे.





