राजगृहावर हल्ला करणाऱ्या माथेफिरुंवर कायदेशीर कारवाई करा

जळोची  : मुंबई दादर येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ऐतिहासिक राजगृहाची तोडफोड करणाऱ्या माथेफिरुंवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी व सदरील इमारतीस  24 तास संरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बारामती’ यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आले.

रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा सचिव सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विजय डँडी सोनवणे, तालुका अध्यक्ष मधुकर मोरे, शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र सोनवणे, जिल्हा महिला कार्याध्यक्ष रत्नप्रभा साबळे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदरील निवेदन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना देण्यात आले.

भारतीय राज्यघटनेचे  शिल्पकार, आधुनिक भारताचे जनक, विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई दादर येथील ऐतिहासिक राजगृह या निवासस्थानावर हल्ला करून नासधूस झालेली आहे. या घटनेमुळे आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सदरील घटनेचा आम्ही निवेदनाद्वारे जाहीर निषेध करतो.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सदरील इमारत आपल्या पुस्तक ठेवण्यासाठी खास करून बांधली होती.  संपूर्ण जगातून राजगृहास आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शामुळे सदरील इमारत आंबेडकरी जनतेस व शासनास एक उज्वल ठेवा असल्यामुळे इमारतीवर झालेला हल्ला हा आंबेडकरी जनतेचे मन दुखवणारा व अस्मितेवर घाला घालणारा असल्याने समाजातून रोष व्यक्त होत आहे. असेही सदरील निवेदनात  म्हटले आहे.

यावेळी तालुका सरचिटणीस संजय वाघमारे, उद्योग आघाडी अध्यक्ष माऊली कांबळे, शहर संपर्क प्रमुख निलेश जाधव, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष उमेश शिंदे,  महिला आघाडी शहराध्यक्ष पुनम घाडगे, सरचिटणीस रजनी साळवे, रिपाई शहर उपाध्यक्ष रोहित सोनवणे, मोईन बागवान, तालुका चिटणीस माऊली सरतापे, दादा  सोनवणे, पत्रकार विराज शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.