नांदेड : अशोक चव्हाण यांचे मेहनतीचे पैसे नाहीत. त्यांचे पैसे घ्या पण मत कॉंग्रेसला द्या, असे म्हणत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. नांदेड येथील भोकर विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
रेड्डी सभेत बोलताना म्हणाले, अशोक चव्हाण यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहित नसेल. त्यांचे मेहनतीचे पैसे नाहीत. त्यांचे पैसे घ्या पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा. अशोक चव्हाण यांनी काही घाम गाळून पैसे कमावले नाहीत. त्यांच्या खिशातूनही पैसे काढून घ्या, ते ही कमी पडले तर त्यांच्या घरी जाऊन ज्या-ज्या वस्तू आहेत त्यापण घेऊन टाका, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
पुढे बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले, आता विधानसभा निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवायचा आहे. पैसे भेटतील दारू पाजतील. तसेच, खोटे बोलण्याची स्पर्धा लागली तर मोदी यांचा एक नंबर येईल, असा खोचक टोला रेवंत रेड्डी यांनी लगावला आहे. निवडणुकीत इमानदार उमेदवार जिंकणे महत्त्वाचे आहे. मोदींना पराभूत करायचे आहे, अशोक चव्हाण यांना हरवायचे आहे. राजकारणात अशोक चव्हाण दिसू नये कारण त्यांनी तुमचे नाव खूप खराब केले आहे, असेही रेवंत रेड्डी म्हणाले.