पूर बाधितांनो, आरोग्याची काळजी घ्या

प्रशासनाचे आवाहन : पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचा दावा

पुणे – अतिवृष्टीमुळे आंबील ओढ्यासह सहकारनगर, सिंहगड रोड, दत्तवाडी, कात्रज भागांतील ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे परिसरात जमा झालेला कचरा आणि गाळ काढण्याचे मोठे आव्हान महापालिका कर्मचाऱ्यांसमोर आहे. तसेच पुरामुळे काविळ, गॅस्ट्रो, टायफॉइडसह डेंग्यू, मलेरियाचे आजार वाढण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

कात्रज, सहकारनगरातील टांगेवाला कॉलनी, तावरे कॉलनी, के. के. मार्केट, दत्तवाडी, दांडेकर पूल या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ही घाण काढल्यानंतर काही दिवसांत आजार वाढण्याची शक्‍यता आहे. अस्वच्छतेमुळे काविळ, उलट्या जुलाबांचा आजार असलेला गॅस्ट्रो, त्वचेचे आजार वाढण्याची भीती आहे. घाणीच्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा आजार वाढू शकतो. येत्या काही दिवसांत या आजारांचे रुग्ण आढळण्याची शक्‍यता आहे.

जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत लेप्टोस्पायरोसिसचे 10 रुग्ण आढळले होते. त्यामुळे आताही पूरस्थितीमुळे असे रुग्ण आढळतील. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसची लागण होऊ नये, यासाठी पूरस्थिती असलेल्या भागातील रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक गोळ्या दवाखान्यासह रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. लक्षणे दिसल्यास त्यांना उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

पूरग्रस्त भागात महापालिकेचे डॉक्‍टर आरोग्य सेवा देत असून, 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सुविधा आहे. तसेच या भागात औषधफवारणी करण्यात येणार असून, नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू असून, औषधांचा पुरेशा साठा आहे.
– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख पुणे मनपा 

Leave A Reply

Your email address will not be published.