मैत्रिणींनी, अशी घ्या पायाची काळजी…

रोज अंघोळ करताना पायाची विशेष काळजी घ्या. गरम पाण्यात पाय बुडवून ठेवा. पायाची बोटे हलवत राहा. नंतर थंड पाण्यात पाय बुडवा. तुम्ही रोज जशी अंघोळ करता तसेच हेसुध्दा रोज करायचे आहे. सकाळी जमत नसेल तर रात्री झोपताना तर करायलाच हवे. दिवसभराच्या धावपळीनंतर गरम पाण्यात पाय बुडवून ठेवल्याने किती आराम मिळतो हे त्याचा अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही. जड झालेले पाय एकदम हलके होतील.

पाय आणि पोटऱ्या जास्तच दुखत असतील तर गरम पाण्यात खडे मीठ ओंजळभर टाका आणि मग त्यात पाय बुडवा. पायातल्या वेदना काही मिनिटातच कमी होतात. घोट्याचे सांधे मोकळे होतात. पायावरचा धुळीचा थर आणि टाचांवर साचलेली धूळ खडबडीत दगडाने किंवा प्युमिक स्टोनने घासा. टाचांवर जमा झालेला निर्जिव त्वचेचा थरसुध्दा या घासण्यामुळे निघून जातो. नवीन त्वचा वर यायला त्यामुळे संधी मिळते. रोज किंवा नियमितपणे पायाला क्रिम किंवा तेल लावायला हवे. बोटांची नखे वाढली असतील तर वेळच्यावेळी कापायला हवी. वाढलेल्या नखाच्या खाली एखादा पातळ कडक पुठ्ठा ठेवून नख कापल्यास नखाचे कोपरेसुध्दा नीट कापता येतात.

पायांसाठी रोज व्यायामही करायला हवा. पायाची कमान मजबूत राहावी म्हणून चवड्यावर आणि टाचेवर चालण्याचा व्यायाम करावा. पोहण्यामुळे पायांना सर्वात चांगला व्यायाम होतो, पण त्याहीपेक्षा चांगला व्यायाम म्हणजे चालण्याचा व्यायाम. मुलांना घरामध्ये किंवा बागेमध्ये अनवाणी धावाधाव करायला परवानगी द्या. त्यांच्या पायांना तो चांगला व्यायाम होईल.

पायांना रोज मसाज करणे आवश्‍यक आहे. आंघोळ झाल्यानंतर किंवा रात्री झोपताना आधी गरम पाण्यात पाय बुडवून झाल्यानंतर पाय कोरडे करूऱ्न बॉडी लोशन किंवा मॉइश्‍चरायझर लावून पायांना मसाज करावा. पाय दुखत असतील तर अल्कोहोलयुक्‍त कोलीनने चोळावे.

पायाला खूप घाम येत असेल तर एखादे ऍस्ट्रिजंट पायाला लावा. ते वाळू द्या. मग त्यावर कोणतीही टाल्कम पावडर लावा. पायमोजे आणि बूट घालताना आधी पायावर टाल्कम पावडर लावा आणि मग पायमोजे व बूट घाला. पायाला जास्त घाम येणार नाही. पायाला दुर्गंधही येणार नाही.

पायाच्या अंगठयाच्याखाली कधीकधी सूज येते. ती येऊ नये म्हणून एक व्यायाम करा. एका हाताने पाय धरा. दुसऱ्या हातात पायाचा अंगठा धरा. पायाचा अंगठा हलकेच बाहेरच्या बाजुला ओढा आणि वर्तुळाकार सावकाश फिरवा. जोर करू नका.

आंघोळ करताना साबणाच्या गरम पाण्यात पाय बुडवून ठेवा. पाण्यातच पाय ठेवून पाय चोळा, पायावरची घाण घासून काढा. नंतर बोटाची नखे नेलकटरनेच कापा. पायाची नखे कापायला कठीण जातात. साबणाच्या गरम पाण्यात पाय बुडवून ठेवल्याने नखे मऊ पडतात व त्यामुळे सहज कापता येतात.

पायावर विशेषत: बोटांमध्ये फंगस इन्फेक्‍शन नेहमी होते. नखामध्येही फंगस वाढते. नखांचा रंग बदलला असेल आणि पायाच्या बोटांच्या बेचक्‍यांमध्ये काळसर डाग दिसत असून खाज येत असेल किंवा आग होत असेल तर डॉक्‍टरांना दाखवा. जेवढ्या लवकर दाखवाल तेवढे चांगले. फंगल इन्फेक्‍शन खूप लवकर सगळीकडे पसरते

पायाच्या बोटांची नखे वाढून आत वळत असतील तर डॉक्‍टरांना दाखवावे. त्यासाठी घरगुती उपाय करू नका. अंगठ्याचे नख वाढून आत वळत असेल तर ते त्वचेला सारखे टोचत राहते. कधीकधी त्याने जखमही होते. मधुमेह असेल तर ही जखम लवकर बरी होत नाही. पायाची नीट काळजी घेतली नाही तर बोटांच्या व पायाच्या जखमा एरवीसुध्दा लवकर बऱ्या होत नाहीत. म्हणून डॉक्‍टरांना दाखवणे आवश्‍यक आहे.

पायाला कुरूप झाले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काहीजण कुरूप ब्लेडने घरीच कापतात.पण ते वरवरचे असल्यामुळे कुरूप परत वाढते. टाचेला कुरूप असेल तर चालताना ते खूप दुखते. कॉर्नकॅप लावून कुरूप जाते असा एक गैरसमज आहे. कॉर्नकॅप लावल्यामुळे कुरूप मऊ पडते. नंतर ते डॉक्‍टरांकडे जाऊन काढून टाकावे लागते. लोकल ऍनेस्थेशिया म्हणजे तेवढी जागा बधिर करून कुरूप मुळासकट काढून टाकावे लागते तरच ते परत येत नाही. कुरूप काढून टाकल्यावर चार-पाचवेळा ड्रेसिंगला जावे लागते. घरी ड्रेसिंग करू नका. कारण जखम खूप खोल असते. घरी ड्रेसिंग केले तर इन्फेक्‍शन होण्याची शक्‍यता असते.

– श्रुती कुलकर्णी

Leave A Reply

Your email address will not be published.