पुणे – दीपोत्सवात वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी सज्ज राहण्यासोबतच वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. यासोबतच नवीन वीजजोडणीच्या कामांना वेग देऊन प्रलंबित असणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजजोडण्या दिवाळीपूर्वी कार्यान्वित कराव्यात, असे आदेश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक वीजयंत्रणा आणि घरगुती विद्युत उपकरणांपासून सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
नागरिकांनो, काळजी घ्या
- महावितरणच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे.
- फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होईल, असे कृत्य करू नये.
- रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये.
- वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत.
- मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत.
महावितरण हेल्पलाइन नंबर
- 1800-1023-435 किंवा
- 1800-2333-435 किंवा
- 1912