‘त्या’ रुग्णालयांवर कारवाई करा

उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

पुणे – करोनाबधित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कार्यवारी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

तसेच, केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहावे, करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या अनुषंगाने नियोजन करावे, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या आहेत.

विधानभवन येथे करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीस लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, जिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तथापि, ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्यात यावी.

जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी करोनाबाधित रुग्णाचे होणारे मृत्यू याबाबत विश्‍लेषण करण्याबरोबरच सूक्ष्म नियोजन करून मृत्यूदर शुन्यावर आणणे, करोना विषाणूचा संसर्ग पसरणार नाही, यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे, असे सांगितले. तर, आरोग्य यंत्रणेने योग्य योजना राबविल्याबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.