सुप्रिया सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
केडगाव – सांसद ग्राम गाव असणाऱ्या दापोडी (ता. दौंड) येथील बेकायदा दारू विक्री बंद करून संबंधितावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा अधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे. याबाबत शनिवारी (दि. 6 जुलै) दैनिक “प्रभात’मध्ये “खासदार सुळेंच्या दत्तक गावात दारूधंदे पुन्हा सुरू’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची खासदारांनी तातडीने दखल घेतली आहेत.
केंद्र शासनाच्या सांसद ग्राम मोहिमेअंतर्गत खासदार सुळे यांनी दापोडी गाव दत्तक घेतले आहे. सध्या त्यांच्या या गावातील कलानगर आणि खोडवे वस्ती परिसरात बेकायदा दारू विक्रीने डोके वर काढले असून, स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. यामुळे सांसद ग्राम गावाच्या लौकिकाला बाधा निर्माण होत आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी “प्रभात’च्या प्रतिनिधिला ही बाब सांगितली. त्यानुसार शनिवारी (दि. 6 जुलै) “प्रभात’ वृत्तपत्राने त्यासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर खासदार सुळे यांनी या वृत्ताची तातडीने दखल घेऊन जिल्हा अधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे दापोडी (ता. दौंड) येथील बेकायदेशीर दारू धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.