संचेती रुग्णालयावर कारवाई करा – लक्ष्मण जगताप

आमदार लक्ष्मण जगताप यांची धर्मादाय आयुक्‍तांकडे मागणी

पिंपरी  -पुणे, शिवाजीनगर येथील संचेती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे गरीबांना उपचार नाकारत असल्याने या रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

या संदर्भात आमदार जगताप यांनी धर्मादाय आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संचेत रुग्णालय हे शासनाच्या जागेत उभे असल्याने धर्मादाय रुग्णालय आहे. धर्मादाय रुग्णालय असल्याने या रुग्णालयात आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अनेकदा प्रशासनाकडून हे रुग्णालय धर्मादाय नसल्याचे सांगत गोरगरीब रुग्णांना उपचार नाकारले जातात. सरकारची सुद्धा फसवणूक सुरू आहे. त्यामुळे या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.

या रुग्णालयाच्या शेजारीच नवीन इमारत उभारण्यात आली आहे. रुग्ण तेथे उपचारासाठी गेल्यानंतर त्याठिकाणी अशा रुग्णांना मार्गदर्शनासाठी बसवण्यात आलेल्या समाजविकास अधिकाऱ्यांची टीम रुग्णांना चुकीची माहिती देतात. हे धर्मदाय रुग्णालय नसल्याचे सांगत मोफत उपचार होणार नसल्याचे गरीब रुग्णांना सांगितले जाते. उपचाराचा संपूर्ण खर्च भरावा लागेल, असेही रुग्णांना सांगितले जाते. त्यामुळे अनेक रुग्ण विना उपचाराचे निघून जातात. जे रुग्ण उपचारासाठी तयार होतात, त्यांची अक्षरशः लूट केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.