पुणे – लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर यंत्रणांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे योग्य सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे आदींचा अवलंब होत नसल्यास कारवाई करून शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात करोना प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मेहता म्हणाले, “करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध, घरोघरी सर्वेक्षण तसेच करोना चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. चाचणीसाठी स्राव नमुना घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी विलंब होणार नाही, याची दक्षता घ्या. घरोघरी सुरू असलेले सर्वेक्षण वाढविण्यासोबतच यामध्ये स्थानिक युवक तसेच सोसायटी अध्यक्षांचाही सहभाग घ्यावा.
पालकमंत्री म्हणाले…
– पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कंटेन्मेंट झोन्समध्ये
– कडक बंधने कोणत्याही परिस्थितीत पाळली जावीत.
– करोनाची साखळी तोडणे हे प्रमुख आव्हान
– उद्योग-व्यवसायांना परवानगी असेल तेथे लक्ष देऊन काळजी घ्यावी.
– पुणे शहर आणि लगतच्या गावांत करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेळीच कडक उपाययोजना कराव्यात
सर्वच फिव्हर क्लिनिकमध्ये आवश्यक मनुष्यबळ व सामग्री तातडीने उपलब्ध करून द्यावी.
– कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्यविषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात.