‘सीएए’ विरोधात कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करा – परांडे

शरद पवारांवरही टीका : बजरंग दलाची अखिल भारतीय बैठक चिंचवडमध्ये

पिंपरी – सीएएच्या विरोधात अनेक हिंसक आंदोलने देशभर सुरू आहेत. त्या पाठीमागे काही अल्पसंख्यांक तुष्टीकरण करणाऱ्या काही राजनीतिक दल, साम्यवादी दल व शक्‍ती, पीएफआय सारखे हिंसक मुस्लीम संघटनांचा हात स्पष्टपणे दिसतो आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पिंपरी येथे केले. विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जी तथाकथित अहिंसक आंदोलने सुरु आहेत. त्यावरून देशविरोधी शक्‍तीसुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत का असे वाटते. अशा सर्व प्रकारच्या हिंसक व देशविरोधी आंदोलनाची विश्‍व हिंदू परिषद निंदा करते व कायदा हातात घेणाऱ्या व तोडणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करते, असेही ते म्हणाले.

यावेळी विश्‍व हिंदू परिषद, पश्‍चिम प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजय देशपांडे, विभाग मंत्री नितीन वाटकर आदी उपस्थित होते.

यावेळी मिलिंद परांडे यांनी बजरंग दलाची अखिल भारतीय बैठक शनिवार व रविवारी (दि. 22 व 23) चिंचवड येथे आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लखनऊ येथे मशिदीसाठीच्या न्यास निर्माणाचा जो अनावश्‍यक विषय समोर आणला आहे. यावरून नवीन-नवीन विवादाचे मुद्दे निर्माण करून समाजातील तेढ जाणीवपूर्वक वाढवण्याचा डाव आहे.

रथयात्रांचे आयोजन
उच्च न्यायलयात श्रीराम जन्मभूमीच्या ऐतिहासिक सत्याची प्रतिस्थापना झाल्यामुळे विश्‍व हिंदू परिषदेने संपूर्ण देशभर 25 मार्च ते 8 एप्रिल 2020 हनुमान जयंतीपर्यंत भव्य रथायात्रांचे आयोजन करून किमान 2 लाख स्थानांपर्यंत भव्य रामोत्सवाचे आयोजन करण्याचा निश्‍चय केला आहे. आंदोलनाच्या दरम्यान जे मंदिराचे प्रारूप बनले त्याच स्वरूपामध्ये व ज्या दगडांची घडाई मागील अनेक वर्षापासून अयोध्येमध्ये सुरु आहे त्यांचा उपयोग करूनच श्रीराम जन्मभूमी मंदिराचे निर्माण व्हावे. ही हिंदू समाजाची अपेक्षा आहे. ती हा नवनिर्मित न्यास पूर्ण करेल हा विश्‍वास वाटतो, असेही मिलिंद परांडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.