शिक्रापूर : सध्या सर्वत्र अतिविषारी घोणस सापांचा मिलनकाळ सुरु असताना पुणे जिल्ह्यात मिळून आलेल्या एका भल्यामोठ्या घोणस सापाला एकाने पकडून त्याचे दात तोडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेने वनविभागाकडे केली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या घोणस सापाला एकाने पकडून लाकूड व दगडाने त्याचे दात तोडल्याचा गंभीर प्रकार केला आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्पमित्रांनी नाराजी व्यक्त केली. ही व्यक्ती पुणे जिल्ह्यातील असल्याचा अंदाज वर्तवला जात असताना त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी.
अशी मागणी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, संचालक दत्ता कवाद, सिकंदर शेख, प्रवीण बामणे, सर्पमित्र शुभम वाघ, अमोल कुसाळकर यांनी वनविभागाकडे निवेदन देत केली आहे.