पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावर केलेल्या आरोपांविरोधात जिल्ह्यातील महसूल, तलाठी संघटना आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांकडून निषेध व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनातील सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन डॉ. दिवसे यांच्या समर्थनार्थ विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन दिले आहे, तसेच प्रशासकीय शिस्त टिकविण्यासाठी आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या प्रतिमेचे संरक्षण होण्यासाठी तातडीने पूजा खेडकरवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
विभागीय आयुक्त यांच्यामार्फत राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना निवेदन दिले आहे. खेडकर यांच्यासंदर्भात जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय शिस्तभंगाचा अहवाल शासनास पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर खेडकर यांनी अशा पद्धतीची तक्रार करणे हे जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखांच्या कर्तव्यात बाधा आणि त्यांची मानहानी करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे, अशी तक्रार करून मूळ विषयास बगल देऊन सहानुभूती मिळवणे व प्रशासकीय संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणे हे घातक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
डॉ. दिवसे यांच्यासोबत गेल्या 25 वर्षांत विविध पदांवर काम केलेले असून, आमच्यापैकी काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. आमच्यापैकी कोणालाच त्यांच्यासमवेत काम करताना वाईट अनुभव आलेला नाही.
त्यांनी आम्हाला एक महिला म्हणून नेहमीच योग्य व सन्मानाची वागणूक दिलेली आहे, तसेच त्यांनी सर्व महिलांना अधिकारी म्हणूनही समानतेची वागणूक दिलेली आहे, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.