आणखी एका डॉक्‍टरवर कारवाईचा बडगा

आयुक्‍तांचे आदेश ः विनयभंग प्रकरणी खातेनिहाय चौकशी

पिंपरी –
शिस्तभंग आणि गैरवर्तन करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त सातत्याने कारवाईचा बडगा उगारत आहेत. गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन करुन अटक झालेल्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप झाला होता. या प्रकरणी अटक होऊन जामिनावर सुटका करण्यात आली होती. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत तालेरा रुग्णालयात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी कार्यरत असलेले डॉ. बाळासाहेब पाराजी होडगर असे कारवाई केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आयुक्‍तांना अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ. होडगर हे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांच्यावर वाकड पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात 12 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांना अटक झाली होती. दुसऱ्या दिवशी 13 फेब्रुवारीला त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. डॉ. होडगर यांच्यावर झालेले आरोप महापालिकेची प्रतिमा मलीन करणारे असल्याचे मानत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील 56 (1) तरतुदींच्या अधिन महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) नियम 1979 च्या 8 अ नुसार खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यापूर्वी डॉ. विनायक पाटील यांची पालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी वेतनवाढ रोखली आहे. त्यानंतर आता आणखी एका डॉक्‍टरांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.