फारूख अब्दुल्लांवर कारवाई व्हावी

कलम 370 बाबत केले वादग्रस्त विधान

नवी दिल्ली- जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सकारच्या निर्णयाच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे ते  नक्की कोणासाठी खड्डा खोदत आहेत, अशी विचारणा करतानाच त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने हे कलम रद्द केल्यामुळेच आज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले होते. तसेच चीनने कधीच भारत सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले नाही असे नमूद करतानाच चीनच्या मदतीने हे कलम पुन्हा बहाल केले जाईल, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले होते.
त्यांच्या या विधानावर आक्षेप घेताना त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तज्ञांनी केली आहे.

याबाबत बोलताना जम्मू काश्‍मीरच्या सुरक्षेबाबत तज्ञ असलेले निवृत्त कॅप्टन अनिल गौर म्हणाले की या राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या व्यक्तीकडून अशा विधानाची अपेक्षा केली जाउ शकत नाही. अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबाने काश्‍मीरवर राज्य केले आहे. त्यांच्या मुलानेही मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. असे असताना त्यांनी जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे. मात्र अब्दुल्ला हे सत्तेत असताना एक बोलतात आणि सत्तेबाहेर असल्यावर वेगळे बोलतात. राज्यातील सध्याची स्थिती बघता एका ज्येष्ठ नेत्याने असे बेजबाबदार वक्तव्य करणे अशोभनीय असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

दरम्यान, माजी आयपीएस आणि केंद्रीय माहिती आयुक्त यशोवर्धन आझाद म्हणाले की, काही वेळा माणूस भावनेच्या भरात काहीतरी बोलून जातो. त्यामुळे या विधानाला महत्व न देता त्यातून कुठला अर्थ काढला जाऊ नये.

दरम्यान, याबाबत अब्दुल्ला यांच्याकडून अद्याप कोणता खुलासा मागवला गेला नसल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

राहुल, अब्दुल्ला एकाच नाण्याच्या दोन बाजू
भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी फारूख अब्दुल्ला आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचे म्हटले आहे.

पाकव्याप्त काश्‍मीर काय तुमच्या बापाचा आहे का, पाकिस्तानने काय बांगड्या भरल्या आहेत का, असे याच अब्दुल्ला यांनी म्हटले होते. तर राहुल गांधी यांनी गेल्याच आठवड्यात पंतप्रधानांना घाबरट म्हटले होते. त्यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या वेळीही शंका उपस्थित केली होती व ते त्यावेळी पाकिस्तानात हिरो ठरले होते. आज त्याच प्रमाणे फारूख अब्दुल्ला चीनमध्ये हिरो ठरले असल्याची टीका पात्रा यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.