पालखी सोहळ्यात नियोजनानुसार कार्यवाही करा

बारामती – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्यात यापूर्वी केलेल्या नियोजनानुसार कार्यवाही करून सोहळा यशस्वी करावा, असे प्रतिपादन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी केले.

बारामती तालुक्‍यातील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या पालखीच्या आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर तहसील कार्यालयामध्ये शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन निकम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीस तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख शिवप्रसाद गौरकर, निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे, सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. लांडे विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

निकम म्हणाले, बारामती तालुक्‍यामध्ये मागील वर्षी पालख्यांच्या मुक्‍कामाच्या ठिकाणी, पालखी मार्गावर प्रशासनाकडून उत्तम प्रकारे नियोजन केले होते. त्यानुसार प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली होती. त्यामुळेच कोणतीही अडचण निर्माण न होता पालखी सोहळा यशस्वीपणे पार पडला. यावर्षी देखील शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून आपापल्या विभागांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात, अशा प्रकारच्या सूचना केल्या.

पालखी काळात महावितरण विभागाकडून अखंडीतपणे वीजपुरवठा करण्यात यावा, डीपीला संरक्षण फेन्सींगची कामे करावीत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालखी मार्गावरील रस्त्यांच्या खड्ड्यांची दुरुस्ती तसेच इतर आवश्‍यक कामे वेळेत पूर्ण करावीत. सार्वजनिक वितरण विभागाने वारकऱ्यांना रॉकेल किंवा गॅस सिलिंडरचा मागणीप्रमाणे पुरवठा करावा. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पुरेशी वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहीका, अत्यावश्‍यक सेवेसाठी खासगी तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये राखीव बेडची व्यवस्था करावी. पालखी मुक्‍कामाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करणार आहे. अग्नीशामक यंत्रणा, नगरपरिषदेने पिण्याचे तसेच वापरण्याचे पाणी उपलब्ध करावे. फिरते शौचालय, पोलीस विभागाकडून पालखी विसावा, मुक्‍कामाचे ठिकाण तसेच पालखी मार्गावर पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन, गर्दीच्या ठिकाणी चोरांचा बंदोबस्त करणे, पालखी काळात कत्तलखाने आणि दारुची दुकाने बंद ठेवणे, पालखीदरम्यान फटाके उडवू नयेत आदी सूचना केल्या. बैठकीनंतर प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मूलन समिती, लोकशाही दिन, अवैध दारु प्रतिबंध समन्वय समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अपंग व्यक्‍तींना राखीव 3 टक्‍के निधी, एकात्मिक समन्वय समिती आदी विषयांच्या बैठका पार पडल्या. यावेळी तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, समिती सदस्य खलील काझी, प्रवीण वाघमोडे, विश्‍वास मांढरे, प्रकाश देवकाते, सदस्या विजया खोमणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)