जीवनगाणे: जपून टाक पाऊल जरा…

अरुण गोखले

विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमातील “दुरितांचे तिमीर जावो’ या नाटकातील “तू जपून टाक पाऊल जरा… जीवनातल्या मुशाफिरा’ हे गीत सादर करून सागर विंगकडे मागे वळला. त्याने सादर केलेले गीत, लावलेला अचूक स्वर, त्या शब्दांना दिलेली अभिनयाची जोड यामुळे त्याचे ते सादरीकरण सर्वांची मने जिंकून गेले.

वाजणाऱ्या टाळ्या, होणारं कौतुक स्वीकारून झगमगत्या रंगमंचावरून खाली उतरत असताना कसा कोणास ठाऊक त्याचा तोल गेला. साळवे सरांनी त्याला वेळीच सावरले, मदतीचा हात दिला म्हणून ठीक. त्याला साळवे सर म्हणाले ही, “”अरे सागर, जपून टाक पाऊल जरा… हे गीत आता तूच सादर केलेस ना? आणि त्यातला सावधतेचा संदेश तूच विसरलास काय?

हे असं त्याचंच काय पण अगदी तुमचं आमचंही होत. कधी कधी आपलाही तोल जातो. प्रत्येकाचाच जीवन हा एक प्रवास आहे. या प्रवासातले आपण मुसाफीर आहोत. ज्याने त्याने हे जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीत उचललेलं पाऊल हे सावधतेचं, जागरूकतेचं, सुज्ञपणाचं, जबाबदारीचं आणि स्वहिताचं असायला हवे, नाही का?

कारण इथे जागोजागी धोका आहे, घसरण आहे, फसवणूक आहे, पिळवणूक आहे. इथला प्रत्येक व्यवहार डोळे उघडे ठेवून करावा लागतो. समोरची व्यक्ती गोड बोलून हातोहात आपल्याला फसवणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

जीवनातले प्रत्येक आर्थिक निर्णय हे पुढचा मागचा नीट विचार करून घ्यावे लागतात. कोणत्याही गोष्टीची निवड करताना, मग तो व्यवसाय असो, नोकरी असो, जमिनीचा किंवा घराचा व्यवहार असो, सोन्यानाण्याची खरेदी असो नाहीतर आयुष्यभराच्या जीवनसाथीची निवड असो. प्रत्येक गोष्ट नीट पारखून तपासून समजून घेऊन खात्री करावी लागते.

इथलं प्रत्येक पाऊल सावधतेने उचलावे लागते. प्रत्येक निर्णय हा पूर्ण विचार करून, तारतम्य राखून घ्यावा लागतो. इथली छोटीशी चूक किंवा डोळेझाक ही परिणामी फार घातक ठरू शकते.
त्या संभाव्य धोक्‍यापासून दूर राहण्यासाठी, घसरणारं पाऊल घसरण्या आधीच सावरण्यासाठी, निवड चुकली म्हणून पस्तावा करण्याची वेळ येण्याआधी, अधिकाच्या लोभासाठी हातचं सारचं घालवून बसलो असं होऊ नये यासाठी आपल्याला जीवनातलं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वकच उचलावे हवे, हे विसरून चालणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)