सायकलद्वारे करा प्राणिसंग्रहालयाची सफर

सायकल सेवेचा शुभारंभ : 50 सायकल्स पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध

कात्रज – कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी आता पर्यटकांना सायकलद्वारे सफर करता येईल. तसेच, कमी वेळेत प्राणिसंग्रहालय पाहता येणार आहे.

मनसेचे नगरसेवक वसंतराव मोरे यांच्या संकल्पनेतून व “युलू’ कंपनीमार्फत स्मार्ट सिटीमाध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात प्रायोगिक तत्त्वावर 50 सायकल्स पर्यटकांच्या सोयीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या सायकलींचे नगरसेवक मोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, पर्यावरण अधिकारी डॉ. नवनाथ निघोट, मंगेश दिघे, आप्पासाहेब वांजळे, युलू सायकल्स कंपनीचे पुणे शहरप्रमुख रितेश राठोड, गार्गी घोष आदी उपस्थित होते. उद्‌घाटनानंतर सर्वांनी सायकलची राईड मारण्याचा आनंद घेतला.

स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे शहरामध्ये ज्याप्रकारे प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल्स झोन करून नागरिकांना त्या वापरण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे प्राणिसंग्रहालयामध्येही पर्यटकांना जास्त चालावे लागू नये व कमी वेळेमध्ये प्राणिसंग्रहालय पाहून व्हावे. यासाठी या पर्यावरण पूरक सायकल ठेवण्यात आल्या आहेत. त्या “जीपीएस’ कनेक्‍टेड असणार आहेत. माफक दरात त्या पर्यटकांना उपलब्ध होणार आहेत. ऑनलाइन एप्लीकेशन डाउनलोड करून त्याद्वारे सायकलवरील बारकोडवरून भाडे जमा होणार आहे. यामुळे पर्यटकांना सोपे होणार आहे. सुरुवातीला युलू कंपनीमार्फत दोन कर्मचारी पर्यटकांच्या सोयीसाठी प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.

शिवाय, या सायकल्स महिला-पुरुष यांना सहजतेने चालवता येतील अशा डिझाईनमध्ये आहेत. तर या सायकल बारा वर्षांवरील मुलापासून ते सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत यांना चालवता येणार आहे. यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे.

स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय हे पुणे शहरातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाद्वारे महापालिकेला दरवर्षी पाच कोटींचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्न सात ते आठ कोटी करण्यासाठी व पर्यटकांना योग्य सुविधा पुरवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पर्यटकांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
– वसंतराव मोरे, नगरसेवक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.