जरा हटके : इस्रोची नवी भरारी

श्रीनिवास औंधकर

ज्येष्ठ खगोलशास्रज्ञ

गेल्या दोन तीन दशकांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या एकामागोमाग एक सर्वोच्च आणि यशस्वी कामगिरीमुळे अंतराळविश्‍वात संपूर्ण जगातच भारताची मान गर्वाने उंचावली आहे. अलीकडेच उपग्रहभेदी क्षेपणास्राची यशस्वी चाचणी करून भारताने अंतराळातील महासत्तांच्या पंक्‍तीत प्रवेश केला आहे. नुकताच इस्रोने एमिसॅट हा भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा उपग्रह आणि अन्य 28 नॅनो उपग्रह अंतराळात सोडून एक विक्रम केला आहे. एमिसॅट म्हणजे भारताचा अंतराळातील चौकीदारच असणार आहे. त्यामुळे हा शत्रू राष्ट्रांची चिंता वाढवणारा आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही अलीकडील काळात केवळ देशातच नव्हे तर भारतीय उपखंडात आणि जगभरात सातत्याने चर्चेत असताना दिसते. याचे कारण अंतराळ वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमातून आणि कल्पकतेतून आकाराला येणाऱ्या आणि तितक्‍याच यशस्वी होत जाणाऱ्या अवकाश मोहिमा. गेल्या तीन-चार वर्षांचा आढावा घेतल्यास इस्रोने अक्षरशः विक्रमांचा डोंगर रचला आहे.

गेल्या आठवड्यात इस्रो आणि डीआरडीओने उपग्रहभेदी क्षेपणास्राची यशस्वी चाचणी करून मायक्रोसॉफ्ट आर नावाचा आपलाच उपग्रह पाडण्यात यश मिळवले होते. या यशस्वी चाचणीमुळे भारताने अमेरिका, रशिया आणि चीन या अंतराळातील महासत्तांच्या पंक्‍तीत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आणखी एक कामगिरी करून इस्रोने इतिहास रचला आहे. दि. 1 एप्रिल 2019 रोजी भारतीय वेळेनुसार 9.27 मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 436 किलो वजनाचा एमिसॅट आणि 28 नॅनो उपग्रह पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपकाच्या साहाय्याने अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. यामध्ये अमेरिकेच्या 24, लुथियानाच्या 2 आणि स्पेन व स्वित्झर्लंडच्या एकेक उपग्रहांचा समावेश आहे.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेले रॉकेट चार टप्प्यांचे होते. यापूर्वी आपण दोन किंवा तीन टप्प्यांच्या रॉकेटचाच वापर करत होतो. प्रथमच भारताने तीन वेगवेगळ्या कक्षांमध्ये उपग्रह स्थापित केले. म्हणजेच या मोहिमेतील प्रक्षेपकाने आधी एमिसॅटला 749 किलोमीटर दूर अंतरावर स्थापित केले आणि त्यानंतर 504 किलोमीटर ऑर्बिटमध्ये उर्वरित 28 उपग्रह स्थापित केले. याचाच अर्थ आपला प्रक्षेपक आधी वरच्या टप्प्यावर/ऑर्बिटमध्ये गेला आणि तिथून त्याला खाली आणून उर्वरित उपग्रह स्थापित करण्यात आले. याखेरीज चौथ्या टप्प्यामध्ये सोलर पॅनेल स्थापित करणारे हे पहिले मिशन होते. विशेष म्हणजे उड्डाण झाल्यानंतर एमिसॅट हा निर्धारित कक्षेमध्ये केवळ 17 व्या मिनिटांत पोहोचला. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वाधिक काळ अंतराळात राहून ही मोहीम चालली. म्हणजेच सुमारे तीन तास इतका या मोहिमेचा कालावधी होता. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये पीएसएलव्ही 40 च्या साहाय्याने चाललेली मोहीम 2 तास 31 मिनिटे चालली होती. त्यामुळे आताची मोहीम ही सर्वाधिक लांबीची होती.

यामधील एमिसॅट हा उपग्रह डीआरडीओचा असून त्याचे वजन 436 किलोग्रॅम आहे. हा इलेक्‍ट्रॉनिक इंटेजिलन्स सॅटेलाईट भारताला संरक्षणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. एमिसॅटला आपण भारताचा अंतराळातील गुप्तहेर किंवा भारतीय सुरक्षा दलांचे कान आणि नाक म्हणता येईल. विद्युत चुंबकीय वर्णपटाचे निरीक्षण करण्यासाठी एमिसॅट महत्त्वाचा आहे. इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील महान कूटनीतीतज्ज्ञ कौटिल्य यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारत सरकारच्या डीआरडीओने “प्रोजेक्‍ट कौटिल्य’ नावाचा एक प्रकल्प हाती घेतला होता. साधारणतः 5 वर्षांच्या मेहनतीनंतर या प्रकल्पाला यश आले आणि 436 किलो वजनाचा हा एमिसॅट तयार झाला. डीआरडीओच्या हैदराबाद येथील लॅबमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.

वास्तविक पाहता, अशा संरक्षणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या मोहिमांची किंवा उपग्रहांची तपशीलवार माहिती सार्वजनिकरीत्या दिली जात नाही. कारण त्यामुळे शत्रू राष्ट्रे सावध होण्याची शक्‍यता असते. एमिसॅटबाबतही तसेच काहीसे आहे. या उपग्रहाचे मूळ कार्य शत्रूच्या रडार यंत्रणांवरील माहिती मिळवून देणे हे आहे. इस्राईलच्या “सरल’ नामक टेहळणी उपग्रहावर आधारित आहे. सरल आणि एमिसॅट हे दोन्हीही उपग्रह एसएसबी-2 प्रोटोकॉलचे पालन करतात. भारतासारख्या महाकाय देशात इलेक्‍ट्रॉनिक टेहळणी क्षमतेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे. एमिसॅटचा सर्वाधिक उपयोग भारत-पाकिस्तान सीमेवरील सुरक्षेसाठी होणार आहे. या सीमेवरील कोणत्याही प्रकारच्या मानवी तसेच मोबाईलद्वारे होणाऱ्या हालचालींची माहिती भारताला मिळण्यास मदत होणार आहे. याखेरीज शत्रूच्या भागातील मोबाईल्सची तसेच अन्य संप्रेषण साधनांची अचूक माहिती एकत्र करण्यासाठीही याचा उपयोग केला जाईल. तसेच शत्रू राष्ट्रातील भागांचे इलेक्‍ट्रॉनिक नकाशे बनवण्यासाठीही या उपग्रहाची मोलाची मदत होणार आहे.

जमिनीवरून शेकडो किलोमीटर उंचीवर राहूनही हा उपग्रह भूपृष्ठावरील रडार, संप्रेषण प्रणालींमधून बाहेर पडणारे सिग्नल्स टिपू शकणार आहे. कोणत्याही देशाचे जेव्हा दुसऱ्या देशाशी युद्ध होते तेव्हा त्या युद्धादरम्यान सर्वांत महत्त्वाचे काम असते ते शत्रूचे रडार शोधून ते नष्ट करणे. कारण असे करण्यामुळे शत्रूवर हवाई हल्ला केला तर आपल्या विमानांना शत्रूची एअर डिफेन्स सिस्टीम लक्ष्य करू शकत नाही. नेमके हेच रडार शोधण्याचे काम एमिसॅट अत्यंत खुबीने करणार आहे.
एमिसॅटसोबत अंतराळात जे 28 नॅनो उपग्रह पाठवण्यात आले त्यापैकी 20 नॅनो उपग्रह अमेरिकेतील प्लॅनेट नावाच्या एका कंपनीचे होते. पृथ्वीच्या प्रचंड जवळून छायाचित्रे काढण्याची क्षमता या उपग्रहामध्ये आहे. या कंपनीने आतापर्यंत 300 नॅनो सॅटेलाईट अंतराळात पाठवलेले आहेत.

गेल्या दोन-तीन दशकांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या एकामागोमाग एक सर्वोच्च आणि यशस्वी कामगिरीमुळे अंतराळविश्‍वात संपूर्ण जगातच भारताची मान गर्वाने उंचावली आहे. काही काळापूर्वी उपग्रह प्रक्षेपणात परदेशावर अवलंबून राहिल्यानंतर आज भारत स्वतःच इतका सक्षम झाला आहे की तमाम विकसित देश भारतातून त्यांचे उपग्रह प्रक्षेपित करत आहेत. भारताच्या अवकाश मोहिमांचा सक्‍सेस रेट किंवा यशस्वी होण्याचा दर सर्वाधिक असल्यामुळे आज अमेरिकेसारखे महासत्ता असणारे देशही भारताच्या साहाय्याने आपले उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत आहेत, ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे.

एक काळ असा होता की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन देण्यास नकार दिला होता. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहोचवणारी अश्‍वशक्ती क्षमता आहे. आपल्या पीएसएलव्ही म्हणजेच भू उपग्रह प्रक्षेपण यानाचे यश याच इंजिनांवर अवलंबून होते. आपल्या वैज्ञानिकांनी दृढ इच्छाशक्ती दाखवत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून क्रायोजेनिक इंजिन विकसित केले. इस्रोचे हे स्वदेशी तंत्रज्ञान आता जगभरात अव्वल ठरले आहे. एक काळ असा होता जेव्हा अमेरिकेने आपल्या “रोहिणी 75′ या रॉकेटच्या प्रक्षेपणाला लहान मुलांचे खेळणे असे संबोधून भारत कधीच रॉकेट बनवू शकत नाही अशी उपहासात्मक टिप्पणी केली होती. एवढेच नव्हेतर अमेरिकेच्या सीनेटने असा दावा केला होता की अमेरिका भारतीय भूमीवरून कोणत्याही उपग्रहाचे प्रक्षेपण करणार नाही. मात्र, वैज्ञानिकांची जिद्द आणि प्रयत्नातील सातत्य यामुळे अमेरिका तोंडघशी पडली. आज भारत रॉकेट निर्मितीत सक्षमच आहे असे नाही तर तर भारताने स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनही बनवले आहे. परिणामी अमेरिकाच नव्हे तर जगातील तमाम विकसित देश भारतातून आपले उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी रांगेत उभे आहेत.

(लेखक एमजीएमचे एपीजे अब्दुल कलम खगोल अंतराळ व विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक आहेत.)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.