पंढरपूर – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरदेखील बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
करोना विषाणू प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर दर्शनासाठी बंद आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. मंदिर बंद असल्याने भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची आता ऑनलाईन थेट सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
विठ्ठल-रुक्मिणीचे http://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर थेट ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. तसेच गुगल प्ले स्टोअरवरील shreevitthalrukmnilive Darshan ऍप डाउनलोड करूनही देवदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वरील विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार भाविकांना पाहता येणार आहे.
1 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा करोनाचे सावट असल्याने कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी सोडता येणार नाही. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्शनास पंढरपूरात येणे टाळावे. भाविकांनी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत करण्यात आलेल्या या ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी जोशी यांनी केले आहे.