तैपेई: समलिंगी विवाहांना मान्यता देण्याचा प्रस्ताव आज तैवानच्या संसदेत संमत करण्यात आला आहे. अशा स्वरूपाचे विधेयक संमत करणारे तैवान हे पहिले अशियाई राष्ट्र ठरले आहे. दरम्यान हा निर्णय तैवान या देशाच्या घटनेचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे 24 मे पर्यंत या संदर्भातली घटना दुरूस्ती करण्याची मुदत तैवानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
समलिंगी विवाहासाठी कायदा करावा की करू नये यासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी प्रचंड पाऊस पडला तरीही अनेक समलिंगी जोडप्यांनी मतदानाला हजेरी लावली होती. यासाठी जे मतदान झाले त्यामध्ये 67 टक्के लोकांनी समलिंगी विवाहांना मान्यता देण्याच्या बाजूने मतदान केले. देशाने समानतेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे, अशी प्रतिक्रिया समलिंगी जोडप्यांनी या निर्णयानंतर दिली आहे.
दरम्यान, हे विधेयक बारगळवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत झाला. पण मोठ्या मताधिक्क्याने हे विधेयक संमत झाले. समलिंगी विवाहाला अनुमती देण्याची मागणी तेथील अनेक संघटनांच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी एलजीबीटी समुहाने मोठा लढाही दिला होता. त्यांनी शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागणीचा पाठपुरावा केला. या विधेयकावर तैवानमध्ये जेव्हा चर्चा सुरू होती, त्यावेळी संसदेबाहेर गे हक्क समर्थक मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यांनी हे विधेयक संमत व्हावे म्हणून जोरदार घोषणाबाजीही केली.