मुंबई : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते, थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांकडून आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकारांना अभिवादन करताना के. सी ठाकरे असा उल्लेख केला. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटवर मनसे नेते चांगलेच संतप्त झाले आहेत. दरम्यान, त्यानंतर तातडीने हे ट्विट डिलीट करून नव्याने ट्विट करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकारांना अभिवादन करण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये, “सत्यशोधक विचारांचा वसा घेऊन त्यासाठी आयुष्यभर लढा देणारे प्रबोधनकार के.सी ठाकरे यांची आज जयंती, यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन” अशी पोस्ट केली. त्यात असलेल्या फोटोवर के. सी ठाकरे हे नाव ठळक अक्षरात दाखवण्यात आले तर प्रबोधनकार अगदी छोट्या शब्दात लिहिले होते. या ट्विटवरून वाद निर्माण होताच सुप्रिया सुळेंनी ते ट्विट डिलीट केले.
प्रबोधनकार ठाकरेंना के.सी.ठाकरे म्हणण्या एव्हढ्या मोठ्या झाला नाहीत ताई pic.twitter.com/WFBWpuDfby
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 17, 2022
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सुप्रिया सुळेंच्या याच ट्विटवर प्रतिक्रिया देत “ताई, तुम्ही एवढ्या मोठ्या झाला नाहीत” असा टोला लगावला. देशपांडेंनी सांगितले की, प्रबोधनकार ठाकरेंना के.सी ठाकरे म्हणण्या एवढ्या मोठ्या ताई झाला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मनसेकडून सुळेंच्या ट्विटवर आक्षेप घेतल्यानंतर तातडीने सुप्रिया सुळे यांनी ट्विट डिलीट केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील खंबीर नेतृत्व, थोर समाजसुधारक, कणखर पत्रकार प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. pic.twitter.com/RwEptE8Ewa
— Supriya Sule (@supriya_sule) September 17, 2022
त्यानंतर नव्याने पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी जयंतीनिमित्त प्रबोधनकार ठाकरेंना अभिवादन केले. त्यात म्हटलं की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील खंबीर नेतृत्व, थोर समाजसुधारक, कणखर पत्रकार प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन असं लिहिलं होते.