तहसीलदार साहेब, गावगुंडांपासून आम्हाला वाचवा

शिरूरमध्ये कामगारांचे कुटुंबीयांसह आंदोलन : तहसीलदारांना दिले निवेदन
कंपनी व्यवस्थापनबरोबर गुरुवारी बैठक 

शिरूर – शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे व्यवस्थापन व स्थानिक ठेकेदार, गुंड यांना हाताशी धरून कामगारांना मारहाण, बंद खोलीत डांबून ठेवणे, राजीनामा मागणी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणे, रिव्हॉल्वरचा धाक दाखवणे, असे प्रकार वारंवार होत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 20) शिरूर तहसील कार्यालयावर दीड हजार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी दिवसभर धरणे आंदोलन केले. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार साहेब, आम्हाला गावगुंडापासून वाचवा, अशी मागणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी केली. शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी किरण भुजबळ, विकास साखरे, विठ्ठल गुंडाळ, गोरख जगताप, किसन रोकडे, मच्छिंद्र भंडारे, सुरेश सरडे, दयानंद मुदामे, विकास टेंगले, सोपान बारदे, शिवाजी राठोड, संतोष खेडकर, महेश काशीद, रणधीर सावंत, सागर ढेरंगे, महेश आवारी, जयदीप भंडारे, सूरज बांबेडकर, किशोर पाटील, मनोज पाल, संतोष गव्हाणे, मनोज विजे, समीर वळसे, दीपक महाजन, अनिकेत सूर्यवंशी, विशाल निघोट, हनुमंत भोर, अनिल तुपे, कामगारांचे कुटुंबीय, महिला व दीड हजार कामगार उपस्थित होते.

निवेदनात नमूद आहे की, शिक्रापूर, रांजणगाव, शिरुर, पुणे येथील कंपन्यांमध्ये अनेक कामगार कायमस्वरूपी कामगार आहे. हे कामगार परिसरात वास्तव्यात आहेत. कामगारांनी संघटना करावी, हा कामगारांचा संविधानिक अधिकार आहे. परंतु संघटना करणे कामगार संघटित होणे, हे कोणत्याही कंपनीला मान्य नसते. बाहेर देशातून आलेल्या कंपन्या राज्यात अस्तित्वात असलेले कामगार कायदे पाळण्यात कसूर करतात. त्यामुळे कामगारांना फायदे मिळावे, यासाठी कामगार संघटना तयार करत असतात.

कामगार हक्‍कासाठी नेहमीच उदासीनता भूमिका ठेवलेली आहे. कामगारांनी पुढे संघटित होऊ नये, यासाठी रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहत,सणसवाडी, करंदी येथील वरील चारही कंपन्या स्थानिक गुंड, राजकीय नेत्यांना बरोबर घेऊन कामगारांना शिवीगाळ, मारहाण, बंद खोलीत कोंडणे, महिलांना फोनवरून धमकी देणे, शिवीगाळ, शस्त्राचा धाक दाखविणे, असे प्रकार होत आहेत. याप्रकणी अनेकवेळा रांजणगाव शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. परंतु पोलीस प्रशासनाने राजकीय दबावापोटी कंपनीत दहशत निर्माण करणाऱ्या राजकीय गुंडांना नेहमीच अभय दिला आहे. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना संरक्षण मिळावे, यासाठी कामगारांनी शिरूर तहसीलदार बिराजदार यांना साकडे घातले. यावेळी बिराजदार यांनी गुरुवारी (दि. 25) कंपन्यांचे व्यवस्थापन, पोलीस अधीक्षक, कामगारांची संयुक्‍त बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले.

कायदा-सुव्यवस्था राहिली नाही
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एलजी कंपनी, हायर कंपनी, सणसवाडी येथील प्रजो कंपनी, करंदी येथील ओरिएंटल रबर कंपनीमध्ये राजकीय गुंडांचे ठेके आहेत. हे ठेकेदार नेहमी कामगारांना मारहाण करून त्यांच्यावर दहशत पसरवत आहेत. यांच्याविरोधात व कंपनी व्यवस्थापनाविरोधात अनेकवेळा शिक्रापूर, रांजणगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील औद्योगिक वसाहत परिसरात कायदा-सुव्यवस्था राहिली नसल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.