कारवाईचे संकेत; दै. “प्रभात’च्या वृत्तमालिकेची दखल
कराड – कराड तालुक्यातील महसूल विभागाला लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. तालुक्यातील वाळू असो वा दगड-माती या गौण खनिजाची उघड्या डोळ्यांनी सर्रास लूट सुरू आहे.
या लुटीत महसूल विभाग पुरता बरबटून गेला आहे. दै. “प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या “लाल मातीचा काळा बाजार’ या वृत्तमालिकेनंतर खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने चौकशीचे आदेश देत कारवाईचे संकेत दिले आहेत. तालुक्यातील कृष्णा- कोयना नदीपात्रालगत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बेसुमार माती उपसा सुरू होता. लाल मातीच्या गाळाची रॉयल्टी तर शासकीय नियमाप्रमाणे भरावी लागते.
शिवाय परवाना मिळवण्यासाठी अधिकची रक्कम द्यावी लागत असल्याची चर्चा होती. त्याचा मोठा फटका महसूल विभागाच्या रॉयल्टीला बसला होता. कोयना नदीपात्रालगत तांबड्या मातीचा उपसा असल्याने कराड तालुक्यातील म्होप्रे, तांबवे, सुपने, केसे, वारूंजी गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. दै. “प्रभात’ने या विषयावरील वृत्तमालिकेद्वारे आवाज उठवला. याची दखल घेत महसूल विभागाने तातडीने कराड तालुक्यातील माती उत्खननाच्या चौकशीचे आदेश पारीत करत कारवाईचे संकेत दिले आहेत.
कराड तहसील कार्यालयाकडे मागणी करण्यात आलेल्या अर्जानुसार शासकीय नियमाच्या अधिन राहून माती उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. या उत्खननाची चौकशी करण्याचे आदेश मंडलाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दोषींवर कारवाई करण्यात येईल.
अमरदीप वाकडे तहसीलदार, कराड.