नाशिक विभागातील 19 तहसीलदारांचा समावेश
नगर – राज्यभरातील 98 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली जाणार आहे. यामध्ये नाशिक विभागातील 19 तहसीलदारांचा समावेश असून, जिल्ह्यात कार्यरत असलेले 4 तहसीलदारांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे तहसीलदारपदाच्या पदोन्नतीची वाट पाहाणाऱ्या नायब तहसीलदारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांना देखील तहसीलदार पदी पदोन्नती मिळणार आहेत.
महसूल शाखेचे तहसीलदार सुधीर पाटील, निवडणुक शाखेच्या हेमा बडे, महेश शेलार, किरण सावंत यांना पदोन्नती मिळाली असून हे आता लवकरच उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारणार आहेत. तसेच तत्कालीन तहसीलदार गणेश मरकड, बाबासाहेब गिते, राजेंद्र थोटे, मनीषा राशिनकर, वंदना खरमाळे यांना देखील उपजिल्हाधिकारी पदोन्नती मिळाली आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांची अनेक वर्षांपासून पदोन्नती रखडली होती. विशेषत: तहसीलदार संवर्गातील अनेक अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते.
लोकसभा निवडणुकीनंतर शासनाने 118 तहसीलदारांना पदोन्नती देण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्यानुसार शासनाने 24 जून 2019 रोजी उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नतीस पात्र असणाऱ्या राज्यभरातील 118 पैकी 98 तहसीलदारांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे तहसीलदारपदांच्या अनेक जागा रिक्त होणार असून, ऐन निवडणुकीत ऐवढ्या जागा रिक्त ठेवणे अडचणीचे ठरणार आहेत. त्यामुळे तहसीलदारपदांची पदोन्नती होताच, शासनाच्या वतीने नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती दिली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्याकार्यरत असलेल्या नायब तहसीलदार माधुरी आंधळे, चंद्रशेखर शितोळे, अर्चना भाकड, वैशाली आव्हाड आदींसह पात्र नायब तहसीलदार लवकरच तहसीलदारपदी विराजमान होतील.