सक्षम बॅंकेत विलीनीकरण करण्याची मागणी
केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप
पुणे – ‘जो न्याय इतर खासगी बॅंकांना लावला तोच न्याय शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेला लावावा. येस बॅंक वाचवली, लक्ष्मीविकास बॅंकेचे विलीनीकरण झाले. आता शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचे विलिनीकरण कोणत्याही सक्षम बॅंकेमध्ये करून गरीब खातेदार-ठेवीदारांना न्याय द्यावा,’ अशी मागणी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या खातेदार-ठेवीदार कृती समितीने केली आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या 93 हजार 128 खातेदार-ठेवीदारांच्या सुमारे 432 कोटी 86 लाख रुपयांच्या ठेवी 14 शाखांमध्ये अडकल्या आहेत. संचालक मंडळाच्या गैरकारभारापायी बॅंकेची रोख तरलता संपुष्टात आल्याने रिझर्व बॅंकेने 4 मे 2019 पासून बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे बॅंकेच्या खातेदारांना एक हजार रुपयेच काढता येतात. असे असताना प्रभावशाली व्यक्तीने अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्या विविध खात्यांवर दोन कोटी रुपये वर्ग केले असल्याचे कृती समितीकडून सांगण्यात आले.
खासगी क्षेत्रातील एखादी बॅंक अडचणीत आल्यानंतर केंद्र सरकार लगेच पुढाकार घेऊन या बॅंकांचे विलीनीकरण करते. मात्र, सहकारी बॅंका विलीनीकरणाबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही पावले उचलली जात नाहीत. सहकारी बॅंक अडचणीत आल्यानंतर फक्त आर्थिक निर्बंध लादून खातेदारांची कोंडी केली जाते. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गरीब खातेदारांना मात्र न्याय दिला जात नाही, असेही समितीने म्हटले आहे.
खातेदारांच्या व्यथा…
शिवाजीराव भोसले बॅंक अडचणीत आल्यापासून खातेदार-ठेवीदारांचे जगणे मुश्कील झाले आहे. दौंडमधील एका शेतकऱ्याने शेती विकून आलेले सुमारे 70 लाख रुपये बॅंकेत ठेवले. मात्र, बॅंकेवर आर्थिक निर्बंध आल्याने त्यांच्याकडे औषधौपचारासाठी पैसे नसल्याने त्यांना जीव गमवावा लागला.
एका व्यक्तीने सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले 25 लाख रुपये बॅंकेत ठेवले, बॅंकेच्या व्याजावर निवृत्तीनंतरचे जीवन चालवू, अशी अपेक्षा होती. मात्र, बॅंक बुडाल्याने त्यांना आता सहा हजार रुपये दरमहा पगारावर सुरक्षारक्षकाची नोकरी करावी लागत आहे.
शिवाजीराव भोसले बॅंकेच्या संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे खातेदार-ठेवीदारांना जीवन जगणे असह्य झाले आहे. याबाबत आमचा पाठपुरावा सुरू आहे. शासनाने याप्रकरणी लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा. बॅंकेचे अन्य सक्षम बॅंकेत विलीनीकरण करावे.
– अशोकलाल शहा, अध्यक्ष, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक खातेदार-ठेवीदार कृती समिती