नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे निलंबित समन्वयक ताहिर हुसैन याच्या ईडीने सुनावलेल्या कोठडीला आज दिल्लीतील न्यायालयाने 3 दिवसांची मुदतवाढ दिली.
फेब्रुवारी महिन्यात दक्षिण दिल्लीत झालेल्या जातीय दंगलीशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून त्याच्याविरोधात तपास केला जात आहे.
ताहिर हुसैनने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 1.10 कोटी रुपयांचे मनी लॉन्डरिंग केले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधातल्या आंदोलनाला भडकावण्यासाठी या पैशाचा उपयोग केला गेला, असा ईडीचा आरोप आहे.
यापूर्वी झालेल्या चौकशीचा कालावधी लक्षात घेऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांनी हुसैनच्या कोठडीतील चौकशीसाठी ईडीच्या अर्जाला मान्यता दिली. हुसैनला 15 दिवसांच्या कोठडी दिली गेली होती. या कोठडीची मुदत प्रत्यक्ष कोठडी दिली गेल्यावर लक्षात घेतली जावी, असे ईडीने म्हटले होते.