वॉशिंग्टन – मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात सहभागी असल्याबद्दल फरार घोषित करण्यात आलेला मूळ कॅनडाचा उद्योगपती तहाव्वूर राणा याने केलेला जामीन अर्ज अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळला आहे.
डेव्हिड कोलमन हेडलीचा बालपणचा मित्र असलेल्या राणाला भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून 10 जून रोजी लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा अटक करण्यात आली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनात सहभागी असल्याबद्दल त्याला भारतात फरार घोषित करण्यात आले आहे.
राणा पळून जाण्याची शक्यता असल्याने लॉस एंजेलिसमधील डिस्ट्रीक्ट कोर्टाच्या न्यायाधीश जॅकलीन चूल्जियन यांनी राणाचा जामीनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. जर राणा कॅनडाला पळून गेला तर तो भारतातील संभाव्य फाशीच्या शिक्षेपासून बचाव करू शकतो, अशी शक्यताही न्यायालयाने वर्तवली आहे.
राणाला जामीन मंजूर झाल्यावर भारताबरोबरचे अमेरिकेचे संबंध बिघडण्याची शक्यताही नाकारता येऊ शकत नाही, असे असिस्टन्ट युएस ऍटर्नी जॉन जे. ल्युलेजियान यांनी न्यायालयात सांगितले.
दुसरीकडे राणाच्यावतीने जामिनासाठी 1.5 दशलक्ष डॉलरचा बॉन्ड देण्याची तयारीही दर्शवली होती. याशिवाय 26/11 तील मुख्य आरोपी हेडलीला भारतात प्रत्यार्पण न करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाप्रमाणे आपलेही भारतात प्रत्यार्पण करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद राणाच्यावतीने करण्यात आला होता. मात्र हत्या आणि हत्येच्या कारस्थानाचा भारतातील आरोप असलेली व्यक्ती प्रत्यार्पण टाळण्यासाठी पळून जाण्याची शक्यता अधिक असल्याचे मानून न्यायालयाने राणाला जामीन देण्यास नकार दिला.
पाकिस्तानात जन्म झालेल्या राणाने पाकिस्तानच्या आर्मी मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतले असून तो काही दशके पाकिस्तान सैन्यात डॉक्टर म्हणूनही कार्यरत होता. नंतर तो शिकागोला स्थलांतरित झाला आणि त्याने तेथे आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. 28 एप्रिलला केलेल्या चाचणीत राणाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र आता तो बरा झाला आहे. 13,15 आणि 25 जूनची त्याची चाचणी निगेटिव्ह आली आहे.