नगर – महापालिका अंतर्गत तायक्वांदो व बेसबॉल स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केल्याप्रमाणे स्पर्धेसाठी खेळाडू, पालक स्पर्धा स्थळी उपस्थित झाले. परंतु संघटनांसोबत राहण्याचा निर्धार दोन्ही संघटनांच्या पदाधिकारी व पंचांनी घेतल्याने या स्पर्धेस पंच पुरविण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे आज दोन्ही स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयावर ओढवली.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कुठलीही पूर्वसूचना नसल्याने खेळाडू संभ्रमावस्थेत होते. अनेक खेळाडू शाळेत तर थोड्याफार प्रमाणात खेळाडू स्पर्धा ठिकाणी पालकांसह हजर होते. स्पर्धा पुढे ढकलल्याचे कळताच पालकांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाचा निषेध व्यक्त करत गोंधळ घातला. तालुका क्रीडा स्पर्धा अद्यापही सुरू होऊ शकलेल्या नाहीत.
17 ऑगस्ट रोजी आंदोलन संपेल व 19 पासून क्रीडा स्पर्धा चालू होतील. या उद्देशाने काही तालुक्यांनी नियोजन केले. पण 19 तारखेपर्यंत कुठलाही तोडगा न निघाल्याने श्रीगोंदा व नेवासा तालुक्यातील स्पर्धा बेमुदत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भात निर्णय न झाल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.