चंद्रपूर – राज्यात मिशन बिगिन अंतर्गत नियम शिथिल करत अनेक गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. आता चंद्रपूरमधील जगप्रसिद्ध ताडोबा-व्याघ्र प्रकल्पही 1 ऑक्टोबरपासून पर्यटनासाठी खुले करण्यात आले आहे.
मात्र, यासाठी काही अटी-शर्तींवर लागू करण्यात आल्या आहेत. ताडोबा पर्यटनासाठी सुरू होणार असल्याने देशभरातील व्याघ्र प्रेमींसाठी ही खुशखबर आहे.
ताडोबातील पर्यटन, स्थानिकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न या निर्णयामुळे सुटण्याची शक्यता आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 1 ऑक्टोबरपासून पर्यटन सुरु होत आहे. ताडोबातील ऑनलाईन बुकिंग 16 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरवर्षी 1 ऑक्टोबर ते पावसाळा लागेपर्यंतचा काळ ताडोबातील पर्यटनाचा हंगाम समजला जातो. हा हंगाम कॅश करण्याच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने सर्व तयारी केली केली आहे.
ताडोबाच्या गाभा क्षेत्रात सव्वाशे जिप्सी जाण्याची परवानगी असून सध्या सुमारे 100 जिप्सीला परवानगी देण्यात आली आहे. जिप्सी चालक-मार्गदर्शक आणि पर्यटक या सर्वांना मास्क सॅनिटायझरसह अन्य खबरदारीच्या उपाययोजना पाळाव्या लागणार आहेत. हे पर्यटन सहा प्रवेशद्वारांमधून सुरू होणार आहे.