पुणे – एका तडीपार गुन्हेगाराने कोयता हातात घेऊन संतोषनगर येथे दहशत माजवली होती. कोयत्याचा धाक दाखवत तो जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडत होता. भारती विद्यापीठ पोलिसांना खबर मिळताच त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या विरुध्द भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आर्म ऍक्ट आणी तडीपारीचा भंग असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साकिब मेहबुब चौधरी(22,रा.संतोषनगर, कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी 6 सप्टेबर 2020 रोजी दोन वर्षाकरीता तडीपार केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संतोषनगर येथील डिलाईट बेकरीच्या मागे एक व्यक्ती कोयता घेऊन दहशत माजवत असल्याची खबर पोलिस कर्मचारी सचिन पवार व राहूल तांबे यांना मिळाली होती. त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिल्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानूसार भारती विद्यापीठ पोलिसांचे एक पथक घटनास्थळी गेले. तेथे आरोपी साकिब हा हातात कोयता घेऊन दहशत माजवताना दिसला. त्याच्या जवळ पोलिस जाताच, तो पळुन जाऊ लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. पोलिस ठाण्यात त्याचे रेकॉर्ड तपासले असता, तो सराईत गुन्हेगार असून त्याला तडीपार करण्यात आल्याचे आढळले.
ही कारवाई पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी संतोष भापकर, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे आणी विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.