पिंपरी – तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात बेकायदेशीररित्या आलेल्या गुंडास अटक करण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी तडीपार गुंडाने पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी बालाजीनगर, भोसरी येथे घडली.
विठ्ठल ऊर्फ नाऱ्या अंबादास शिंदे (वय 25, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक सचिन विश्वास मोरे यांनी शुक्रवारी (दि. 2) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे याची बालाजीनगर, भोसरी परिसरात दहशत असल्याने आणि तो वारंवार गुन्हे करीत असल्याने पोलीस उपायुक्त यांनी 16 एप्रिल 2019 रोजी त्यास दोन वर्षाकरिता संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र शासन किंवा पोलीस उपायुक्त यांची कोणतीही परवानगी न घेता आरोपी शिंदे हा बालाजीनगर परिसरात आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी शिंदे याने पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. पोलीस उपनिरीक्षक जी. एल. चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.