मुंबई (प्रतिनिधी) – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघाही डॉक्टर आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आरोपी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना 72 दिवसाच्या कोठडीनंतर प्रत्येकी दोन लाख रुपयाचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.
तसेच या तिन्ही महिला डॉक्टरांचे वैद्यकिय परवाने हा खटला संपेपर्यंत स्थगित करण्याचे निर्देश न्यायालयाने मेडिकल कौंसिलला दिले.
डॉ. पायल तडवी हिने नायर रुग्णालयाच्या वसहतीगृहात 22 मे रोजी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघा डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाबरोबरच ऍट्रोसिटी आणि रॅगिंग प्रतिबंधक कायद्या अन्वये आगरीपाडा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सत्र न्यायालयाने या तिघींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
सत्र न्यायालयाच्या जामिन फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिकेवर न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी आरोपीच्या वतीने ऍड.आबाद पोंडा यांनी युक्तीवाद केला. विशेष सरकारी वकिल ऍड. राजा ठाकरे यांनी मात्र जामीनाला विरोध केला.