संगमनेरात एटीएम फोडून सतरा लाख लांबवले

नाशिक-पुणे रस्त्यावरील घटना ः एटीएम चारचाकी वाहनात टाकून चोरट्यांनी पळविले

संगमनेर – संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे मार्गावरील एटीएम सेंटर फोडून चोरट्यांनी सुमारे सतरा लाखांची रोकड लांबविली. गुंजाळवाडी शिवारातील बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम शुक्रवारी (दि. 22) पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आली आहे. एटीएम फोडून केल्या जात असलेल्या लाखो रुपयांच्या चोऱ्यांचा तपास लागलेला नसताना आता ही नवी कामगिरी पोलिसांवर येऊन ठेपली आहे.

अनेक एटीएम रात्री रामभरोसे

एटीएम फोडण्याच्या व त्यातील रक्कम चोरीच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र अनेक प्रकरणांचा अद्यापही तपास लागलेला नाही. अनेक ठिकाणी एटीएम सेंटरवर रखवालदार नसल्याचे दिसते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या एटीएमची सुरक्षा रामभरोसेच असते. त्यामुळे कमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एटीएमवर सर्रास चोरटे डल्ला मारत असल्याचे दिसून येते. एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नेमले जात नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचेच दिसून येत आहे.

संगमनेर महाविद्यालयाजवळ गुंजाळवाडी शिवारात पुणे-नाशिक मार्गावर बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. या शाखेच्या बाहेर एटीएम सेंटर आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्यावेळी अज्ञात दोघा चोरट्यांनी या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करत ते फोडले. एरव्ही दिवसभर वर्दळीचे असलेल्या या एटीएमकडे रात्रीच्यावेळी फारसे कोणी फिरकत नाही. चोरट्यांनी महामार्गावरील हे एटीएम लक्ष्य केले. महामार्गावर देखील वर्दळ फारशी नसल्याने एटीएम फोडण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देखील मिळाला. फोडलेले एटीएम वायररोपच्या साह्याने सेंटर बाहेर ओढल्याचे व ते गाडीत टाकून नेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

बाहेरच्या पटांगणामध्ये एटीएममध्ये स्लिपांसाठी वापरल्या जाणारा कागदी रोल, एटीएमचा काही भाग पोलिसांना आढळून आला. तसेच तेथे एका चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुणादेखील आढळल्या. त्यामुळे वाहनातून हे मशिन चोरट्यांनी लंपास केले असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले असून, त्यात संशयितांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्‍वानपथकाच्या मदतीने देखील चोरीचा तपास लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चोरटे वाहनाने पसार झाले असल्याने त्यांचा माग लागला नाही.

दरम्यान, शनिवारी दुपारी सिन्नर (नाशिक) जवळच्या माळवाडी येथे या एटीएमचा काही भाग पोलिसांना आढळल्याची माहिती मिळाली. तसेच घटनेच्या काही वेळापूर्वी नाशिक-पुणे मार्गावरील आंबीखालसा शिवारातून एका बोलेरोची चोरी झाल्याचे पुढे आले आहे. चोरट्यांनी कदाचित हेच वाहन गुन्ह्यासाठी वापरले असावे, असा संशय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.