नवी दिल्ली : तबलिगी जमातचा संस्थापक मौलाना साद कंधिवली यांच्या करोनाच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच त्यांना अद्याप ते फरार असल्याबद्दलचे समन्स मिळाले नाही, अशी माहिती त्यांचे वकील फझैल अयुबी यांनी दिली.
“ते फरार नाहीत. तसेच त्यांना हजर होण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कळवले नाही. आम्हाला समन्सची कोणतीही प्रत मिळाली नाही. आम्हाला आतापर्यंत तीन नोटीस मिळाल्या असून त्या सर्वांना आम्ही उत्तर दिले आहे. मरकज आणि तबलिगी जमातचे सर्व जण पोलिसांना सहकार्य करत आहेत,असा दावा अयुबी यांनी केला.
देशात करोनाचा प्रसार होण्यास मुख्य कारण ठरलेल्या तबलिगी जमातच्या मेळाव्यानंतर साद आणि त्यांची संघटना वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. लॉकडाऊनचे नियम तोडल्याबद्दल साद यांचा दिल्ली पोलिसांकडून शोध जारी आहे.
अलीकडेच साद यांच्या मरकज येथील कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला होता. तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले होते. गेल्या आठवड्यात सक्तवसुली संचनालयाने त्यांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्यास सुरवात केली होती.