टेबल टेनिस: राधिका सकपाळ आणि वेदांग जोशी कॅडेट गटांत विजेते

प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे: राधिका सकपाळ आणि वेदांग जोशी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करताना 12 वर्षांखालील मुली व मुलांच्या गटात (कॅडेट) विजेतेपद मिळवून प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला.
तिसरे मानांकन असलेल्या राधिका सकपाळने 12 वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित देवयानी कुलकर्णीचा 8-11, 11-8, 11-4, 11-3 असा खळबळजनक पराभव करताना विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच देवयानीने राधिकावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. त्यामुळे पहिली गेम देवयानीने 8-11 अशी जिंकत आघाडी घेतली. मात्र राधिकाने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करताना दुसरी गेम 11-8 असा आपल्या नावे करीत 1-1 अशी बरोबरी साधली. दुसरी गेम गमावल्याने दडपणाखाली आलेल्या देवयानीवर आक्रमण करताना राधिकाने पुढील दोन्ही गेम आपल्या नावे करत विजेतेपद पटकावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्पूर्वी, उपान्त्यपूर्व फेरीत देवयानी कुलकर्णीने आठवे मानांकन असलेल्या आकांक्षा मार्कंडेचा 11-2, 11-8, 11-8 असा पराभव करत उपान्त्य फेरी गाठली तर उपान्त्य फेरीत तिने चौथे मानांकन असलेल्या साक्षी पवारचा 11-6, 11-8, 11-5 असा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. राधिका सकपाळने उपान्त्यपूर्व फेरीत सहावे मानांकन असलेल्या रिया पाठकचा 11-1, 11-2, 11-4 असा एकतर्फी पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता. तर उपान्त्य फेरीत तिने दुसरे मानांकन असलेल्या आनंदिता लुणावतचा 11-6, 11-2, 11-4 असा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

बारा वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत अग्रमानांकित वेदांग जोशीने सहावे मानांकन असलेल्या निशांत गद्रेचा 12-10, 11-3, 11-0 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच वेदांगने निशांतवर वर्चस्व गाजवताना पहिल्या गेममध्ये जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करूनही हा सेट निशांतने थोडक्‍यात गमावला. पहिला सेट गमावल्यानंतर वेदांगने निशांतला सामन्यात पुनरागमनाची संधीच दिली नाही आणि त्याने पुढील दोन्ही गेम एकतर्फी जिंकत विजेतेपदाची निश्‍चिती केली.

ईशा-आदर्श मिश्र दुहेरीत विजेते

ईशा जोशी व आदर्श गोपाल यांनी मिश्र दुहेरीत विजेतेपद आपल्या नावे केले. मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत ईशा जोशी आणि आदर्श गोपाल या द्वितीय मानांकित जोडीने अभिजीत गायकवाड आणि शुभदा चोंदेकर या चतुर्थ मानांकित जोडीचा 11-7, 11-6, 11-6 असा एकतर्फी पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ईशा-आदर्श जोडीने त्याआधी उपान्त्य लढतीत सुयोग पाटील व चावबा थाऊनावजाम या तृतीय मानांकित जोडीवर 12-14, 11-8, 5-11, 11-8, 11-9 अशी संघर्षपूर्ण मात केली होती. तर अभिजीत-शुभदा जोडीने उपान्त्य लढतीत वैभव दहीभाते व पूर्वा सोहोनी या अग्रमानांकित जोडीवर 11-2, 14-12, 11-8 अशी सनसनाटी मात करीत अंतिम फेरी गाठली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)