कोलकाता – करोनाच्या धोक्यामुळे स्पर्धा बंद असल्याने देशातील अनेक खेळाडूंना चक्क रस्त्यावर भाजीपाला विकण्याचीही वेळ आली आहे. त्यातच आता देशाची नवी गुणवत्ता अशी ओळख असलेल्या टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष देखील आर्थिक संकटात सापडली आहे.
जागतिक ज्युनिअर टेबल टेनिस क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या स्वस्तिकाला रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे जमवणे शक्य होत नसल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे ती मुंबईतच अडकून पडली आहे. एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती मुंबईत आली होती. आता तिला राहात असलेल्या घराचे भाडे देणेही शक्य होत नसल्याचे तिनेच सांगितले आहे. पश्चिम बंगालमधील आपल्या घरी जाणेही तिला सध्या शक्य होत नाही, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
स्वस्तिका तिचे वडील संदीप यांच्याच मार्गदर्शनाखाली सराव करते. ते नवी मुंबईतील नेरुळच्या एका शाळेत नोकरी करत होते. मात्र, स्पर्धा व सराव नाही तर वेतनही नाही अशी भूमिका शाळेने घेतल्याने त्यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ते देखील स्वस्तिकाला पैसे पाठवू शकत नसल्याचे स्वस्तिकाने सांगितले आहे. आता अशा परिस्थितीत मदतीला कोण पुढे येणार हा प्रश्न स्वस्तिकासमोर निर्माण झाला आहे.