नागपूर – भारताच्या माजी टेबल टेनिसपटू मीना परांडे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांनी 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीना या 12 वर्षांपूर्वी पुण्याहून नागपूरला आल्या होत्या. प्रथम मैत्रबन वृद्धाश्रमात आणि मग वर्धा मार्गावरील समाधान केअर सर्व्हिसमध्ये त्या वास्तव्यास होत्या.
प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मावळली. मीना यांनी जवळपास दोन दशकांच्या टेबल टेनिसमधील कारकीर्दीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली होती. त्यांनी चार वेळा राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
त्या 1953 ते 1958 या कालावधीत महाराष्ट्र, तर 1959 ते 1965 या कालावधीत रेल्वेकडून खेळल्या. तसेच मीना यांनी 1954मध्ये इंग्लंड, तर 1956मध्ये जपान येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सिंगापूर, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि श्रीलंका आदी देशांमध्येही स्पर्धा खेळल्या होत्या.