दुबई –आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आज ( रविवारी) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. या दोन्ही संघांना आतापर्यत टी-20चे जेतेपद जिंकता आलेले नाही. 2007 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने एकदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. तर दुसरीकडे न्यूझीलंड प्रथमच जेतेपदासाठी मैदानात उतरणार असल्याने या सामन्याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला आहे. ( Australia have won the toss and elected to field ) कर्णधार ऍरन फिंच याने क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत निर्णायक विजय मिळविला होता. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये विक्रमी पाच वेळा विश्वचषक पटकावणारा ऑस्ट्रेलिया यंदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे.
दुसरीकडे, न्यूझीलंडने नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्य ठेवले आहे. परंतु आता केन विल्यमसनच्या चतुर नेतृत्वाखाली संघाचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे. न्यूझीलंड संघाचा हा टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला अंतिम सामना असला तरी ते विजयाच्या ध्येयानेच खेळणार आहे.