शारजा – चरिता असालंका, भानुका राजपक्षे व पाथुम निसांका यांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील लढतीत बांगलादेशचा 5 गडी राखून सहज पराभव केला.
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशचा सलामीवीर लिटन दास लवकर बाद झाला. त्यानंतर अनुभवी शाकिब उल हसन यानेही निराशा केली. दुसरीकडे महंमद नईमने जबाबदारीने फलंदाजी केली. त्याने मशफिकुर रहिम याला साथिला घेत संघाचा डाव सावरला. या जोडीने श्रीलंकेच्या गोलंदाजीवर वर्चस्व राखताना आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 53 धावांची बहुमोल भागीदारी केली. नईमने 52 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर मुशफिकुर रहिमने अर्धशतकी खेळी केली.
रहिमने 37 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार फटकावताना नाबाद 57 धावा केल्या. अफिफ हुसेन व कर्णधार महंमदुल्लाहने थोडीफार चमक दाखवताना बांगलादेशला 20 षटकांत 4 बाद 171 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली.
विजयी लक्ष्य श्रीलंकेने 19 व्या षटकांत पार केले व सोप्या विजयाची नोंद केली. श्रीलंकेचा डाव सुरु झाला व लगेचच सलामीवीर कुशल परेरा बाद झाला. त्यानंतर पाथुम निसांका आणि चरिता असालंका या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी केली. शाकिब अल हसनने स्थिरावलेल्या निसांका त्रिफळा उडवला. त्यानंतर अविष्का फर्नांडोही बाद झाला. यंदाच्या स्पर्धेत भरात असलेला वनिंदू हसरंगाही 6 धावा काढून परतला. त्यानंतर मात्र, असलंकाने राजपक्षेला साथिला घेत संघाचा विजय दृष्टीपथात आणला.
विजयासाठी 7 धावांची गरज असताना राजपक्षे बाद झाला. त्याने 31 चेंडूत 53 धावांची खेळी करताना 3 चौकार व 3 षटकार फटकावले. राजपक्षे बाद जाल्यानंतर असालंकाने कर्णधार दासुन शनाकाच्या साथीत संघाचा विजय साकार केला. असलंकाने 49 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 80 धावांची खेळी केली. शनाका 1 धाव काढून नाबाद राहिला. बांगलादेशकडून नसुम अहमद व शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. महंमद सैफुद्दीनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – बांगलादेश – 20 षटकांत 4 बाद 171 धावा. (महंमद नईम 62, मुशफिकुर रहिम 57, चमिका करुणारत्ने 1-12, बिनुरा फर्नांडो 1-27, लाहिरू कुमारा 1-29). श्रीलंका – 18.5 षटकांत 5 बाद 172 धावा. (पाथुम निसांका 24, भानुका राजपक्षे 53, चरिता असालंका नाबाद 80, दासुन शनाका नाबाद 1, शाकिब अल हसन 2-17, नसुम अहमद 2-29, महंमद सैफुद्दीनने 1-38).