शारजा – मुजीब उर रेहमान व रशिद खान यांच्या फिरकीसमोर स्कॉटलंडच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. स्कॉटलंडचा डाव अवघ्या 60 धावांत संपवत अफगाणिस्तानने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यात 130 धावांनी विजय मिळवला.
अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 191 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना सलामीवीर जॉर्ज मुनसे, कर्णधार काएल कोएत्झर व ख्रिस ग्रीव्हज यांचा अपवाद वगळता स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला दोनअंकी धावा करता आल्या नाहीत. मुनसेने 18 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 25 धावांची खेळी केली. कर्णधार कोएत्झरने 10 धावा केल्या. संघाच्या बिनबाद 28 धावा झालेल्या असताना कोएत्झर बाद झाला आणि त्यानंतर स्कॉटलंडच्या फलंदाजांनी पूर्ण हाराकिरी केली. तळात ख्रिस ग्रीव्हजने 12 धावांची खेळी केली. रेहमानने एकाच षटकांत 3 फलंदाजांना बाद केले. त्याने 4 षटकांत 20 धावा देत 5 फलंदाजांना बाद केले. त्याला सुरेख साथ देताना रशिद खानने 4 गडी बाद केले. नवीन उल हकने 1 गडी बाद केला.
अफगाणिस्तानने 20 षटकांत 4 गडी गमावून 190 धावांचा डोंगर उभा केला. अफगाणिस्तानचा कर्णधार महंमद नबी याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे सलामीवीर हजरतउल्लाह झझाई व महंमद शेहजाद यांनी अर्धशतकी सलामी दिली. शेहजाद 15 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 22 धावांवर बाद झाला. त्यानंतर रेहमानउल्लाह गुर्बाजने झझाईला साथ देत धावांचा वेग वाढवला. दरम्यान झझाई अर्धशतकाच्या जवळ आलेला असतानाच 30 चेंडूत 3 चौकार व 3 षटकार फटकावत 44 धावांवर बाद झाला.
गुर्बाजही अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. त्याने 46 धावांची खेळी करताना 37 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार व तब्बल 4 षटकार खेचले. मात्र, बाद होण्यापूर्वी त्याने तिसऱ्या गड्यासाठी नजीबुल्लाह झर्दानसह 87 धावांची भागीदारी केली. झर्दानने थाटात आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने कर्णधार महंमद नबीसह संघाला 190 धावांचा डोंगर उभारून दिला. 20 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर झर्दान 59 धावांवर बाद झाला. नबी 11 धावांवर नाबाद राहिला. झर्दानने आपल्या खेळीत 34 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 3 षटकार फटकावले.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान – 20 षटकांत 4 बाद 190 धावा. (नजीबुल्लाह झर्दान 59, रेहमानउल्लाह गुर्बाज 46, हजरतउल्लाह झझाई 44, महंमद शेहजाद 22, महंमद नबी नाबाद 11, सफियान शरीफ 2-33). स्कॉटलंड – 10.2 षटकांत सर्वबाद 60 धावा. (जॉर्ज मुनसे 25, ख्रिस ग्रीव्हज 12, काएल कोएत्झर 11, मुजीब उर रेहमान 5-20, रशिद खान 4-9).