दुबई – एडन मार्करम, वॅन दर दुसेन व रीजा हेंड्रीक्स यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या या लढतीतील विजयामुळे दक्षिण आफ्रिकेला दिलासा मिळाला असून त्यांची उपांत्य फेरी गाठण्याची आशाही कायम राहिली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार थेंबा बवुमाने नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी दिली. इवान लेविस व कॅरन पोलार्ड यांचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. लेविसने संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून देताना दमदार अर्धशतकी खेळी केली.
त्यानंतर मात्र, तो धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 35 चेंडूत 3 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 56 धावा काढून बाद झाला. पोलार्डही भरात होता. मात्र, त्यानेही 20 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना 26 धावांची केली करत आपली विकेट स्वस्तात फेकली. प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्याने वेस्ट इंडिजचा डाव 20 षटकांत 8 बाद 143 धावांवर रोखला गेला. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने 3 गडी बाद केले. केशव महाराजने 2 बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेले 144 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 19 व्या षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. कर्णधार व सलामीवीर थेंबा बवुमा केवळ 2 धावांवर धावबाद झाल्यानंतर हेंड्रीक्स व दुसेन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. हेंड्रीक्स अनावश्यक फटका मारून बाद झाला. त्याने 30 चेंडूत 4 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या.
तो बाद झाल्यानंतर दुसेनने एडन मार्करमला साथिला घेत तिसऱ्या गड्यासाठी 83 धावांची अखंडित भागीदारी केली व संघाचा डाव सावरला. दुसेनने 51 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 43 धावा केल्या. तर, मार्करमने नाबाद अर्धशतकी खेळी करताना केवळ 26 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. वेस्ट इंडिजकडून अकिल हुसेनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडिज – 20 षटकांत 8 बाद 143 धावा. (इवान लेविस 56, कॅरन पोलार्ड 26, ड्वेन प्रिटोरियस 3-17, केशव महाराज 2-24). दक्षिण आफ्रिका – 18.2 षटकांत 2 बाद 144 धावा. (रीजा हेंड्रीक्स 39, एडन मार्करम नाबाद 51, वॅन दर दुसेन नाबाद 43, अकिल हुसेन 1-27).